सोलापूर  : उपमहापौर राजेश काळे अखेर भाजपातून निलंबित

Last Updated: Jan 14 2021 9:52AM




सोलापूर  : पुढारी वृत्तसेवा 

महापालिका उपायुक्‍तांना शिवीगाळ व खंडणी मागितल्याप्रकरणी अटकेत असलेले भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांना अखेर भाजपने पक्षातून निलंबित केले असून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही कारवाई केली आहे. काळे पक्षातून निलंबित झाले असले तरी त्यांचे उपमहापौरपद मात्र शाबूत आहे.

शहर भाजपचे सरचिटणीस शशी थोरात यांनी बुधवारी पत्रकारांना माहिती दिली की, अनेक महिन्यांपासून वारंवार गैरवर्तन करणारे भाजपचे उपमहापौर काळे यांना प्रदेश कार्यालयातील अनुशासन समितीकडून निलंबित करण्याच्या झालेल्या शिफारसीनुसार प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमहापौर यांच्यावर पक्षातून निलंबनाची कारवाई केली आहे. यावेळी सभागृह नेते श्रीनिवास करली उपस्थित होते.

महापालिकेतील भाजपचे विद्यमान उपमहापौर राजेश काळे सध्या कारागृहात आहेत. कारण काळे यांनी शिवीगाळ करून पाच लाखांची खंडणी मागितली, अशी फिर्याद महापालिकेचे उपायुक्‍त  धनराज  पांडे यांनी उपमहापौर काळे यांच्याविरुध्द पोलिसांत दिली होती. दरम्यान, भाजपने याप्रकरणी उपमहापौर काळे यांना खुलासा करण्याची नोटीस बजावली होती. काळे यांचा खुलासा प्राप्‍त होताच शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी काळेंचा खुलासा आणि शहर भाजपचा अहवाल प्रदेश कार्यालयास पाठवला होता.

भाजपचे पक्ष निरीक्षक मकरंद देशपांडे यांनी उपमहापौर राजेश काळे प्रकरणी सोलापुरात येऊन भाजपचे आ. विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख, महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृहनेते श्रीनिवास करली आदींचे महत्त्वाचे जबाब नोंदवले होते.

राजेश काळे यांचे उपमहापौरपद कायम

मनपा उपायुक्‍तांना शिवीगाळ करून खंडणी मागितल्याप्रकरणी अटकेत असलेले भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांच्यावर भाजपने निलंबनाची कारवाई केली असली तरी त्यांचे उपमहापौरपद शाबूत आहे. याबाबत सरचिटणीस थोरात म्हणाले, काळे यांच्याबाबत पुढील कारवाईबाबत महापौर व सभागृहनेते पक्षाकडे प्रस्ताव देतील. त्यानुसार पक्ष कारवाई करेल. पण काळे यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव मनपा प्रशासनाकडूनच सर्वसाधारण सभेकडे येणार आहे. तसे सूतोवाच मनपा आयुक्‍तांनीच केले आहे. तसा प्रस्ताव सभेसमोर आल्यानंतरच पुढे काय तो निर्णय होणार आहे.