Wed, Aug 12, 2020 20:27होमपेज › Solapur › ‘सिद्धेश्‍वर’ विश्‍वस्तांतील वाद चिघळला

‘सिद्धेश्‍वर’ विश्‍वस्तांतील वाद चिघळला

Published On: Jun 18 2018 10:45PM | Last Updated: Jun 18 2018 10:20PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्‍वर मंदिरातील विश्‍वस्तांमधील मतभेद सोमवारी पुन्हा उघड झाले. मंदिराचे विश्‍वस्त संजय थोबडे यांनी मंदिराच्या आवारातच पत्रकारांशी संवाद साधत मंदिराचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी एकाधिकारशाही चालविल्याचे सांगितले. काडादी यांच्या हुकूमशाही व मनमानी कारभारामुळे मंदिर समितीला लाखो रुपयांचा दंड भरावा लागत आहे आणि हा दंड जनतेकडून आलेल्या देगण्यांतून देण्यात आला आहे. याबाबत जाब विचारला असता कोणतीही माहिती व उत्तर न देता आपल्यालाच विश्‍वस्तपदावरून काढून टाकण्याची नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे नाईलाजाने आपण सिद्धेश्‍वर भक्‍तांसमोर जाब विचारण्याच्या हेतूने ही पत्रकार परिषद बोलावल्याचेही संजय थोबडे यांनी सांगितले.

सिद्धेश्‍वर देवस्थानचे संस्थापक हे आपले वडील अण्णाराव थोबडे हे असल्याची  माहिती  उपलब्ध  झाल्यावर आपण धर्मराज काडादी यांना वारंवार त्याची शहानिशा करा, झालेल्या बैठकांचे इतिवृत्त द्या, अशी मागणी करत होतो. परंतु ती माहिती देण्यास  देवस्थानकडून  टाळाटाळ करुन आपल्याला देण्यात येत नव्हती. उलट आपल्यालाच नोटीस देण्यात आली. या नोटिसीला आपण उत्तर दिले असता ते असमाधानकारक आहे, असे सांगत आपल्याला  बडतर्फीची आणखी एक नोटीस देण्यात आली आहे. 

काडादी यांच्या या मनमानीविरोधात मुंबई धर्मादाय आयुक्‍तांकडे आपण त्यांच्या बडतर्फीची मागणी केली आहे. याचा रोष मनात ठेऊन त्यांनी आपल्याला कारवाईची नोटीस दिली असल्याचेही थोबडे यांनी सांगितले. गेल्या  महिन्यात  मंदिरातील पुजारी हब्बू यांनी त्यांच्या मागण्यांसाठी उपोषण केले. हब्बू यांच्या मागण्या योग्य असून त्यांना त्यांचा हक्‍क दिला गेला पाहिजे. मी करतो  आणि मी सांगतो तीच पूर्व दिशा,  असा  कारभार चालला आहे. त्यांच्याविरोधात कोणी बोलण्याचे धाडस करत नाही. मी स्वतः सर्व माहिती घेऊन सिद्धेश्‍वर भक्‍तांसमोर सद्यस्थिती मांडत असल्याचेही थोबडे यांनी सांगितले. 

दरम्यान, संजय थोबडे यांची पत्रकार परिषद देवस्थान आवारात होऊ नये याची काळजी मंदिर व्यवस्थापनाने घेत कार्यालयाला कुलूप लावले होते. त्यामुळे थोबडे यांनी मुख्य गाभार्‍यासमोरील सभामंडपात उभारूनच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मंदिर व्यवस्थापन समितीच्या काही अधिकार्‍यांनी थोबडे यांना पत्रकार परिषद घेऊ नका अशी विनंती केली असता थोबडे यांनी मी संस्थापक विश्‍वस्तांपैकी एक आहे आणि बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे सांगत संवाद साधला.

...तर राजीनामा देऊन राजकारणात उतरा : पालकमंत्री 

संजय थोबडे यांची पत्रकार परिषद सुरु असताना पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे मंदिराच्या आवारात आले. त्यावेळी पत्रकारांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मी नियमित मंदिरात दर्शनाला येतो. मंदिरामध्ये आध्यात्मिक कार्य व्हावे, राजकारण होऊ नये, अशी आपली अपेक्षा आहे. परंतु काहीही झाले की त्यामागे पालकमंत्री आहेत, अशी चर्चा करुन सातत्याने राजकारण केले जात आहे. राजकारणाची एवढी हौस असेल तर राजीनामा देऊन मैदानात उतरा, असे पालकमंत्री देशमुख म्हणाले.

आजवर प्रामाणिकपणे काम केले : काडादी

यावेळी मंदिराचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्याशी पत्रकारांनी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मंदिरात पत्रकार परिषद घेऊ नये, इतरत्र पत्रकार परिषद घेण्यास तसेच बातम्या प्रसिध्द करण्यास आपला विरोध नाही. मी प्रामाणिकपणे आजवर काम केले आहे. यापुढेही सिध्देश्‍वर भक्‍तांच्या पाठिंब्याने हे काम करत राहणार आहे, अशी ग्वाहीही मंदिर समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी यावेळी बोलताना दिली.