Tue, Jul 07, 2020 17:57होमपेज › Solapur › इतरांकडे मागणारा संतच असू शकत नाही : शरद पवार

इतरांकडे मागणारा संतच असू शकत नाही : शरद पवार

Published On: Apr 03 2019 11:07PM | Last Updated: Apr 03 2019 11:07PM
सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर हा पुरोगामी विचारांचा जिल्‍हा आहे. चुकिच्या गोष्टींचा या जिल्‍ह्याने कधी स्वीकार केला नाही. डाव्या विचारांना पाठिंबा देणारा का जिल्‍हा आहे. पण, याच सोलापुरात निवडणुकीसाठी भगवे वस्र परिधान केलेले महाराज उमेदवार म्हणून उभे आहेत. साधू, संत कोणाकडे काही मागत नाहीत. दुसर्‍याकडे हात पसरणारा संतच असू शकत नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी भाजपचे सोलापूरचे उमेदवार डॉ. जयसिध्देश्‍वर महास्वामी यांच्यावर केली.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाइं कवाडे गट, रिपाइं गवई गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, तेलुगु देशम, जनता दल सेक्युलर, महाआघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ  बुधवारी शहरातील राजेंद्र चौक येथे प्रचारसभा पार पडली. यावेळी खा. पवार बोलत होते. व्यासपीठावर यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, आ. रामहरी रुपनर, माजी आमदार दिलीप माने, विश्‍वनाथ चाकोते, प्रकाश यलगुलवार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले  आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना पवार म्हणाले, ‘‘गत निवडणुकीत भाजपने 9 ते 10 महाराज लोकसभेत निवडून आणले. परंतु, या महाराजांनी गेल्या पाच वर्षांमध्ये जनतेचा एकही प्रश्‍न संसदेत उपस्थित केला नाही. यांना विचारले तर म्हणतात, आमच्यावर परमेश्‍वराची कृपा आहे. परमेश्‍वराची कृपा माझ्या भक्तांवरही होईल. पण, आज शेतीला पाणी नाही, युवकांना नोकर्‍या नाहीत ते बेरोजगार होवून फिरत आहेत. तरीही महाराज मंडळी सगळ्याचे कल्याण होईल अशी बतावणी करतात. असे म्हणत पवारांनी भाजपवर निशाना साधला.

‘‘निवडणुकीत महाराज उभा करण्याचे हे लोण सोलापुरातही दाखल झाले आहे. भगवे वस्त्र परिधान केलेले हे महाराज स्वतःलाच देव म्हणत आहेत. मला मत द्या म्हणून दारोदार हात पसरत फिरत आहेत. परंतु, साधू, संत हे कधीच कोणाकडे काही मागत नाहीत. तर ते इतरांना नेहमी काही तरी देत असतात. इतरांकडे हात पसरणारे संतच असू शकत नसल्याची टीका पवारांनी यावेळी केली.