होमपेज › Solapur › राजर्षी शाहू समतेचे दीपस्तंभ : शिंदे

राजर्षी शाहू समतेचे दीपस्तंभ : शिंदे

Published On: Jan 02 2018 1:17AM | Last Updated: Jan 01 2018 11:10PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

राजर्षी शाहू छत्रपती हे रयतेच्या दुःखाचे निवारक होते. ते समता आणि स्वातंत्र्याचे दीपस्तंभ आहेत. त्यांच्यावरील मराठी ग्रंथाचे उर्दू भाषांतर होत आहे. ही घटना ऐतिहासिक आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. 

राष्ट्रीय उर्दू पुस्तक प्रदर्शनाचा समारोप रविवारी सायंकाळी सात वाजता करण्यात आला. यावेळी प्रख्यात इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांच्या “राजर्षी शाहू महाराज समाजक्रांतीचे प्रणेते” या पुस्तकाच्या उर्दू आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर पोलिस आयुक्‍त महादेव तांबडे, हाजी मकबूल शाब्दी, आसिफ इक्बाल, हारुन बागवान, मोहम्मद अयाज, बशीर परवाज, चेतन नरोटे, अ‍ॅड. यू. एन. बेरिया, कमलसिंग, वसुदा पवार, श्रीकांत मोरे, शफी कॅप्टन, अनवर कमिशनर, फेरोज आलम, शाहनवाज खुर्रम, निजामोद्दीन शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

शिंदे म्हणाले, पुस्तक प्रदर्शनामुळे संयोजकांनी समाजामध्ये शिक्षणाची आवड निर्माण करण्याचे काम केले. उर्दू ही परकीय भाषा नसून भारतीय भाषा आहे. भलेही त्याची सुरुवात दिल्लीमधून झाली असेल मात्र ती महाराष्ट्रात मोठी झाली. उर्दू भाषा ही जीवनाची मोठी शक्‍ती आहे. उर्दू प्रसार विभागाला शासनाने भरीव असा निधी द्यावा. सध्याचा निधी हा अपुरा आहे. उर्दू पुस्तक प्रदर्शन हा युवकांसाठी चांगला उपक्रम ठरला आहे. सोलापुरातही उर्दूप्रेमींची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे यावरून दिसून आले, असे मत शिंदे यांनी व्यक्त केले. 

प्रारंभी ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज इन्कलाब के बादशहा’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. या पुस्तकात शाहू महाराज यांच्याबाबत वसुदा पवार यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी अध्यक्ष बशीर परवाज आणि अ‍ॅड. यू. एन. बेरिया यांनी मनोगत व्यक्‍त केले. असद चाऊस विद्यार्थ्याने सुशीलकुमार शिंदे यांना मराठी भाषेतील कुराण भेट म्हणून दिले. कमलसिंग यांनी आभार मानले. 

समारोपप्रसंगी राजर्षी छत्रपती शाहू महाराज इन्कलाब के बादशहा या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यावेळी आसिफ इक्बाल, हारुन बागवान, मोहम्मद अयाज, हाजी मकबूल शाब्दी, बशीर परवाज, सुशीलकुमार शिंदे, पोलिस आयुक्त महादेव तांबडे, अ‍ॅड. यू. एन. बेरिया, कमलसिंग, वसुदा पवार आदी उपस्थित होते.