सोलापूर : पुढारी वृत्तसेवा
सोलापूर शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून, शुक्रवारी एकाच दिवशी 6 जणांचा मृत्यू झाला आहे. आणखी 21 कोरोना संक्रमितांची नोंदही झाली आहे. त्यामुळे सोलापुरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत बाधितांची संख्या 516 वर पोहोचली आहे. मृत पावलेल्यांची संख्या 40 झाली आहे. अद्याप 252 जणांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, शुक्रवारी आणखी 14 जणांना बरे वाटल्यामुळे घरी सोडण्यात आल्याने 216 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. त्यामुळे आरोग्ययंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाच्या कार्यकुशलतेवर आता शंका उपस्थित केली जात आहे.
शुक्रवारी आढळून आलेल्या रुग्णांमध्ये शोभादेवीनगर, नई जिंदगी 1 पुरुष, शिवशरणनगर एमआयडीसी 1 महिला, सात रस्ता 1 पुरुष, लोकमान्यनगर 3 महिला, पुना नाका 1 पुरुष, जगदंबानगर 1 पुरुष, हैदराबाद रोड सोलापूर 1 पुरुष, कर्णिकनगर 1 पुरुष असे रुग्ण नव्या भागात आढळून आले आहेत. यापूर्वी सापडलेल्या भागामध्ये नई जिदंगी 1 महिला, कुमठा नाका 1 पुरुष, 1 महिला, नीलमनगर 3 पुरुष, 6 महिला, मिलिंदनगर, बुधवार पेठ 1 पुरुष, मुरारजी पेठ 2 पुरुष, 1 महिला, मराठा वस्ती भवानी पेठ परिसरात 1 महिला कोरोनाबाधित आढळून आली आहे. तर उपरी, (ता. पंढरपूर) येथे मुंबई येथून आलेला 1 पुरुष कोरोनाबाधित आढळून आला आहे. शुक्रवारी एकाच दिवसात सर्वाधिक 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पाचेगाव (ता. सांगोला) येथील एका 64 वर्षीय पुरुष, कुर्बान हुसेननगर भागातील 58 वर्षीय पुरुष, तेलंगी पाच्छा पेठ परिसरातील 72 वर्षीय पुरुष, सलगर वस्ती देगाव रोड परिसरातील 55 वर्षीय पुरुष, मराठा वस्ती, भवानी पेठ परिसरातील 58 वर्षीय महिला, तर सिध्देश्वरनगर, जुळे सोलापूर भागातील एका 46 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत 14 हजार 650 लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यापैकी 7 हजार 182 जणांना घरी सोडण्यात आले आहे. अद्यापही 7 हजार 468 जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
इन्स्टिट्यूशनल विभागात 5 हजार 321 जणांना ठेवण्यात आले होते. त्यापैकी 3 हजार 663 लोकांचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 1 हजार 658 जण इन्स्टिट्यूशनल विभागात आहेत. आयसोलेशन विभागात आतापर्यंत 5 हजार 353 जणांना ठेवण्यात आले होते. त्यापैकी 5 हजार 194 जणांची कोरोना तपासणी पूर्ण झाली आहे. त्यापैकी 4 हजार 678 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 516 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. अद्यापही 159 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. शुक्रवारी बरे होऊन 14 रुग्ण घरी गेले आहेत. अद्यापही 252 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
आतापर्यंत दोन पोलिसांचा मृत्यू
शहरात कोरोनामुळे मृत्यू पावणार्यांची संख्या वाढत असून, आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोघा पोलिसांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही पोलिस एकाच पोलिस ठाण्यात कार्यरत होते. शुक्रवारी 46 वर्षीय पोलिस नाईक असलेल्या एका कर्मचार्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यापूर्वी त्याच पोलिस ठाण्यातील एका सहाय्यक फौजदाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. आतापर्यंत शहर आणि जिल्ह्यात 17 पोलिस संक्रमित आढळून आले होते. ग्रामीण पोलिस दलातील 13 पैकी 11 जणांना बरे वाटल्यामुळे त्यांना चार दिवसांपूर्वीच घरी सोडण्यात आले आहे.
खासगी हॉस्पिटल घेणार ताब्यात
शहरात वाढत असलेल्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आता शहरातील काही खासगी हॉस्पिटल कोरोना विषाणूने बाधित व्यक्तींवर उपचारासाठी ताब्यात घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा कायद्यांतर्गत कोरोना विषाणूची बाधा झालेल्या व्यक्तींवर उपचारासाठी दवाखाने ताब्यात घेण्याचे अधिकार प्रशासनाला प्रदान करण्यात आले आहेत. या आदेशानुसार जिल्हाधिकारी शहर अथवा जिल्ह्यातील कोणतेही हॉस्पिटल उपचारासाठी ताब्यात घेऊ शकतात. शहरासाठी महापालिकेचे आयुक्त यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.