Tue, Mar 09, 2021 16:11
माढा तालुक्यातील बेपत्ता युवकाचा निर्घृण खून झाल्याचे उघड; अनैतिक संबंधातून खून झाल्याचा अंदाज

Last Updated: Jan 21 2021 9:43PM
टेंभुर्णी : पुढारी वृत्तसेवा

माढा तालुक्यातील टाकळी (टें) येथील बेपत्ता संजय महादेव गोरवे (वय २३) या युवकाचा खून झाल्याचे अखेर उघड झाले आहे. खून झालेल्या युवकाचा (गणेशवाडी, ता.इंदापूर) हद्दीत भीमा नदीच्या पात्रात शीर धडावेगळे व हातपाय तोडलेल्या अवस्थेत निर्घृण खून केलेला मृतदेह मिळून आला होता. या खून प्रकरणी इंदापूर पोलिसांनी अवघ्या सहा तासात दोन तरुणांना ताब्यात घेतले. ही घटना बुधवारी २० जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली होती. 

या खून प्रकरणी दोन आरोपींना इंदापूर न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. विकी उर्फ व्यंकटेश विजय भोसले, महेश प्रभाकर सोनवणे (दोघे रा.टाकळी (टें) ता. माढा जि.सोलापूर) अशी आरोपींची नावे आहेत. अनैतिक संबंधाच्या संशयावरुन हा खून झाला असावा,असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, आज गुरुवारी इंदापूर पोलिसांनी  मृत युवकाचे धड, हात, पाय व अंगावरील कपडे मिळालेली जप्त केली आहेत. 

या संदर्भात माहिती देताना सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित जाधव यांनी सांगितले की, दि.१७ जानेवारी रोजी मयत संजय गोरवे हा बेपत्ता झाला होता. दुसऱ्या दिवशी त्याच्या नातलगांनी टेंभुर्णी (जि.सोलापूर) पोलिस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची खबर दिली. २० जानेवारीला सकाळी सात वाजता गारअकोले ते गणेशवाडी या गावांना जोडणाऱ्या भीमा नदीवरील पुलाखाली नदीपात्रात शीर व हात,पाय धडावेगळे केलेल्या अवस्थेतील अंदाजे २५ ते ३० वर्षे वयाच्या अनोळखी अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती.

नंतर त्याची ओळख पटवून टाकळी (टें) येथील संजय महादेव गोरवेचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, विभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूरचे पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी तपास पथक तयार करून आरोपींचा शोध सुरु केला. 

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सहा तासात दुपारी दोन वाजता टेंभुर्णी येथून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्हा कबुल केला आहे. आरोपींना इंदापूर न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. इंदापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत. सहायक पोलिस निरीक्षक अजित जाधव, दाजी देठे, हवालदार के.बी.शिंदे, पोलिस नाईक जगदीश चौधर, पोलिस शिपाई एस.जी.नगरे, अमोल गायकवाड, आरिफ सय्यद यांनी अवघ्या सहा तासात आरोपींचा छडा लावला.