Tue, Aug 11, 2020 22:07होमपेज › Solapur › पाथर्डी पोलिस ठाण्यातच तळीरामाने घातला गोंधळ

पाथर्डी पोलिस ठाण्यातच तळीरामाने घातला गोंधळ

Published On: Dec 10 2017 1:22AM | Last Updated: Dec 09 2017 11:26PM

बुकमार्क करा

पाथर्डी : शहर प्रतिनिधी

रस्त्यावर भांडण करणार्‍या तळीरामाला पाथर्डी पोलिस ठाण्यात गुरुवारी दुपारी आणण्यात आले. पोलिस ठाण्यात आल्यानंतर त्या तळीरामाने आक्षेपार्ह वर्तन केले. त्या प्रकारानंतर त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्याऐवजी चोप देऊन केवळ ताकीद देऊन सोडून देण्यात आले. परंतु, तो तळीराम शासकीय सेवत असल्याने त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई केली नाही. या प्रकरणाची पाथर्डी शहरात खमंग चर्चा सुरू आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, शहरातील एका शासकीय कार्यालयात  लिपिक म्हणून काम करणारा तळीराम गुरुवारी दुपारी दारुच्या नशेत तराट होऊन पोलिस ठाण्याच्या बाहेरील झेरॉक्सच्या दुकानासमोरून चालला होता. रस्त्याने चालण्याचीही शुद्ध नसल्याने त्याची शाळेतून घरी चाललेल्या विद्यार्थ्याला किरकोळ धक्का लागला. त्यानंतर त्या तळीरामाने विद्यार्थ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तेथील उपस्थितांनी सोडवासोडवी करून तळीरामाला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याला पकडून पोलीस ठाण्यात आणून बसवले. 

पोलिस ठाण्यात बसल्यानंतरही तळीरामाने बक्बक् सुरू ठेवली. त्याने पोलिस ठाण्यात उपस्थित असलेल्या एका महिलेशी आक्षेपार्ह वर्तन केले. त्यामुळे संतापलेल्या महिलेसह  काही पोलिस कर्मचार्‍यांनी त्या तळीरामाची यथेच्छ धुलाई केली. दरम्यान, या घटनेची कुणकुण तळीराम जेथे नियुक्तीस आहे, तेथील कार्यालयात लागली. तेथील अधिकारी व कर्मचार्‍यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. कार्यालयाची अब्रू वाचविण्यासाठी पोलिस ठाण्यात आक्षेपार्ह वर्तन करणार्‍या तळीरामाविरुद्ध गुन्हा दाखल होऊ न देण्यासाठी मध्यस्थी केली. पोलिस ठाण्यात आक्षेपार्ह वर्तन करण्यासारखा गंभीर प्रकार होऊनही पोलिसांनी गुन्हा दाखल न करताच तळीरामाच्या कार्यालयातील अधिकार्‍यांच्या विनंतीवरून केवळ माफीनामा लिहून घेतला व त्याला सोडून दिले. या प्रकरणाची दोन दिवसांपासून पाथर्डी शहरात खमंग चर्चा सुरू आहे.