Wed, Aug 12, 2020 21:10होमपेज › Solapur › ‘डोंजा’ मैदानावर तेंडुलकरची बॅटिंग

‘डोंजा’ मैदानावर तेंडुलकरची बॅटिंग

Published On: Dec 20 2017 1:47AM | Last Updated: Dec 19 2017 11:18PM

बुकमार्क करा

परंडा : शहाजी कोकाटे

भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी आदर्श ग्राम योजनेंतर्गत दत्तक घेतलेल्या डोंजा (ता. परंडा) गावाच्या मैदानावर चाहत्यांसोबत क्रिकेट खेळून चांगलीच बॅटिंग केली. क्रिकेटच्या देवास पाहण्यासाठी यावेळी हजारो चाहत्यांनी तोबा गर्दी केली होती.

खा. सचिन तेंडुलकर यांनी संसद आदर्श ग्राम योजनेत दत्तक घेतलेल्या परंडा तालुक्यातील डोंजा गावास मंगळवारी भेट दिली.  डोंजा ग्रामस्थांनी सचिनच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. स्वागतासाठी गावच्या वेशीवर भव्यदिव्य कमान उभारण्यात आली होती. सकाळी अकराच्या सुमारास सचिन तेंडुलकर यांचे गावात आगमन झाले. 

यावेळी सचिन तेंडुलकर यांनी गावातील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन पाहणी केली. शाळेच्या बंद खोलीत त्यांनी काही मोजक्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून खेळाइतकेच शिक्षणही महत्त्वाचे असल्याचे सांगत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

ग्रामस्थांशी साधला संवाद

सचिन तेंडुलकर यांनी गावातील सुविधांची पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. गावातील पिण्याच्या पाण्याची टाकी, जिल्हा परिषद शाळेची नवीन इमारत, सिमेंट रस्ता कामांचे उद्घाटन केले.

खा. तेंडुलकर यांच्या दौर्‍यानिमित्त पोलिस, महसूल प्रशासनातील बडे अधिकारी सोमवारपासूनच डोंजा गावात दाखल झाले होते. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. असे असले तरी खा. तेंडुलकर यांनी चाहत्यांमध्ये मिसळून संवाद साधला.

तर स्कोअर चांगलाच होतो

प्रशासन आणि लोकसहभाग यांचा समन्वय साधला तर गावाच्या विकासाचा स्कोअर चांगलाच होतो. विकासासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करू या असे सांगत सचिन तेंडुलकर यांनी ग्रामस्थांना लोकसहभागासाठी प्रेरित केले.