Tue, Jun 15, 2021 12:15
द्वादशी दिवशी देखील पंढरपुरातील विठ्ठल मंदिर राहणार बंद

Last Updated: Feb 23 2021 2:54PM

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने माघी यात्रेत दशमी व एकादशी असे दोन दिवस मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवले आहे. मात्र, उद्या संचारबंदी उठल्यानंतर मठात बसलेले भाविक, तसेच संचारबंदी असलेल्या गावातून तसेच अन्य भागातून भाविक बुधवारी द्वादशीला वारी पोहोच करण्यासाठी येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे भाविकांची सुरक्षितता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार विठ्ठल मंदिर उद्या द्वादशी दिवशी देखील बंद राहणार आहे. त्यामुळे भाविकांनी मंदिराकडे येऊ नये, असे आवाहन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी केले आहे. 

राज्यात कोरोनाच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाकडून खबरदारी घेत लाखोंच्या संख्येने भरणारी माघी यात्रा संचार बंदी लागू करत रद्द केली. तर मंदिर समितीनेही दि. २ फेब्रुवारी रोजी बैठक घेत दशमी माघ एकादशी असे २ दिवस मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ऐन माघ यात्रेत २ दिवस मंदिर बंद ठेवले आहे. मात्र माघवारीकरिता पंढरपूर येथे मठात येऊन बसलेले भाविक, तसेच संचारबंदी असलेल्या पंढरपूर शहरासह १० गावांतील भाविक हे मोठ्या संख्येने द्वादशीला विठ्ठल दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. यामुळे गर्दी वाढून कोरोना वाढण्याची भीती अधिक असल्याने जिल्हा प्रशासनाकडून भाविकांच्या आरोग्याची काळजी घेत विठ्ठल द्वादशीला देखील बंद ठेवण्याबाबत मंदिर समितीला पत्र पाठवून  निर्णय घ्यावा अशी सूचना केली होती. त्यानुसार मंदिर समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत द्वादशीला मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे भाविकांनी बुधवारी द्वादशीला दर्शनासाठी मंदिराकडे येउ नये, असे आवाहन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी केले आहे.