Wed, Aug 12, 2020 21:09होमपेज › Solapur › स्वच्छतेचे काम खासगी संस्थेला देणार

स्वच्छतेचे काम खासगी संस्थेला देणार

Published On: Mar 19 2018 10:28PM | Last Updated: Mar 19 2018 10:02PMपंढरपूर : प्रतिनिधी

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील अंतर्गत भागाची स्वच्छता करण्यासाठी निविदा काढणे,  कर्मचारी सेवा ज्येष्ठतेनुसार आकृतीबंध शासनाला सादर करणे,  महिलांसाठी चेंजिंग रुम, वॉटर ए.टी.एम. उभारण्याबरोबर  श्रीविठ्ठल  रुक्मिणीचे महात्म्य, विविध उपक्रमांची माहिती मोबाईल अ‍ॅपव्दारे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दिली. 
मंदिर समितीची बैठक अध्यक्ष अतुल  भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी संपन्न झाली. या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.  यावेळी  मंदिर समिती सदस्य गहिनीनाथ महाराज औसेकर, नगराध्यक्षा साधना भोसले, संभाजी शिदे, शकुंतला नडगिरे, सचिन अधटराव, डॉ. दिनेशकुमार कदम, कार्यकारी अधिकारी सचिन ढोले, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, लेखाधिकारी रवींद्र वाळूजकर उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ. अतुल भोसले  म्हणाले की, मंदिर परिसर व अंतर्गत भागाच्या स्वच्छतेची 2.48 कोटी रुपयांची  तांत्रिक निविदा खुली करण्यात आली. यामध्य सुप्रिम फॅसिलिटी मॅनेजमेंट, बीएसए कार्पोरेशन लिमिटेड व बीव्हीजी इंडिया लि. या 3 कंपन्या पात्र ठरल्या आहेत. 

भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराची माहिती मोबाईल अ‍ॅपव्दारे तत्काळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.  त्यानुसार त्याचे आज अनावरण करण्यात आले . हे मोबाईल अ‍ॅप गुगल अ‍ॅप स्टोअरवर श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान पंढरपूर या नावाने मोफत उपलब्ध आहे.  मंदिर व्यवस्थापनाच्या आस्थापनेवरील 227 कर्मचार्‍यांच्या प्रारूप ज्येष्ठता यादीला मान्यता देऊन अंतिम सेवा ज्येेष्ठता यादीचा प्रस्ताव आकृतीबंधासह राज्य शासनाला पाठवण्यात येणार आहे. 

मंदिर समितीच्या वतीने पंढरपूरात 5 ठिकाणी वॉटर ए.टी.एम. उभा करण्यात येणार असून त्याला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. शहर व परिसरातील सर्व परिवार देवतांचा विकासाचा आराखडा तयार करण्याला मान्यता देण्यात आली.  लाडू कागदी पिशव्यामधून देऊन प्लास्टिक पिशव्यांपासून कायमस्वरूपी मुक्ती घेण्याचा निर्णय घेतला.   भक्त निवासाचे लॅन्ड स्कॅपिंग व फर्निचर, म्युरल्स, साईन एजेस या कामांच्या निविदा प्रसिद्ध कराव्यात व काम आषाढी पूर्वी पूर्ण करावे. चंद्रभागा नदीत स्नानासाठी येणार्‍या महिलांसाठी चेंजिंग रूम उभा करण्यात येणार आहेत.