होमपेज › Solapur › अनैतिक संबंधातून हॉटेलमधील आचार्‍याचा खून; चौघांवर गुन्हा दाखल

अनैतिक संबंधातून हॉटेलमधील आचार्‍याचा खून; चौघांवर गुन्हा दाखल

Published On: Jun 13 2018 1:35AM | Last Updated: Jun 12 2018 9:33PMसोलापूर : प्रतिनिधी

अनैतिक संबंधातून पाच जणांनी केलेल्या मारहाणीत हॉटेलमधील आचार्‍याचा उपचारावेळी मृत्यू झाला. त्यामुळे याबाबत सदर बझार पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संजू मलप्पा साळे (वय 35, रा. गांधीनगर झोपडपट्टी नं. 5, अक्‍कलकोट रोड, सोलापूर) असे खून झालेल्या आचार्‍याचे नाव आहे.

याबाबत मृत संजूचा मामा श्रीमंत गुराप्पा बंडगर (वय 45, रा. विजापूर, कर्नाटक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमनाथ थोरात, ओंकार थोरात, वंदनाच्या बहिणीचा नवरा (रा. गेंट्याल टॉकीजजवळ, सोलापूर) आणि एका अनोळखी व्यक्‍तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत संजू साळे हे मार्केट यार्डमधील हॉटेल सना येथे वस्ताद, म्हणजे आचारी काम करीत होते. तर वंदना थोरात ही महिला एका रुग्णालयामध्ये साफसफाईचे काम करते. वंदना आणि संजू यांच्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून संबंध होते. संजू याला जखमी अवस्थेत अक्‍कलकोट रोडवरील महालक्ष्मी मंदिराजवळील जंगलातून त्याची पत्नी अंबुबाई हिने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असताना मंगळवारी मध्यरात्री पावणेएकच्या सुमारास संजूचा  मृत्यू झाला. 

2 जून रोजी रात्री संजू हे वंदनाला भेटण्यासाठी  ती  काम  करीत असलेल्या हॉस्पिटलमध्ये गेले होते. त्याच दिवशी रात्री आठच्या सुमारास  संजू यांनी त्यांचा मामा श्रीमंत बंडगर यांना मोबाईल करुन आपल्याला गेंट्याल टॉकिजजवळील श्रीनिवास पोबत्ती यांच्या घरासमोर सत्यसाइ नगर येथे वंदनाचा नवरा  सोमनाथ, मुलगा ओंकार, तिच्या बहिणीचा नवरा व एक अनोळखी व्यक्ती लोखंडी सळई, दगडाने मारहाण करीत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर जखमी संजूला अक्‍कलकोट रोडवरील महालक्ष्मी  मंदिराजवळी जंगलात फेकून देण्यात आले. तिथून पत्नी अंबुबाई यांनी संजूला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

त्यामुळे  याबाबत मृत संजूचा मामा   श्रीमंत  बंडगर यांच्या फिर्यादीवरुन संजूची रखेल वंदना थोरात, तिचा पती सोमनाथ व इतरांविरुध्द वंदनाशी संबंध का ठेवतो, तिला पुन्हा भेटला तर बघ, तुला खल्लासच करतो असे म्हणून वंदना हिच्याशी अनैतिक संबंधाच्या कारणावरुन मारहाण करुन खून करण्यात आल्याची नोंद सदर बझार पोलिस  ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक सय्यद तपास करीत आहेत.