Fri, Sep 18, 2020 18:18होमपेज › Solapur › सोलापूर : पाण्याच्या वादातून भावजयीचा खून

सोलापूर : पाण्याच्या वादातून भावजयीचा खून

Published On: Dec 26 2017 1:35AM | Last Updated: Dec 25 2017 10:39PM

बुकमार्क करा

मुरुम : प्रतिनिधी

शेतीला सामाईक विहिरीचे पाणी देण्याच्या वादातून पुतण्याने चुलतीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोराळ (ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) येथील या खून प्रकरणाला ‘पोस्टमार्टेम’नंतर वाचा फुटली आहे. 

घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोराळ शिवारात बबिता सतीश सुरवसे (वय 38) या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर मुरुम पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती. मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीनंतर डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी खून झाल्याच्या दृष्टीने तपास केला. बबिता या शुक्रवारी म्हैस घेऊन शेतात गेल्या होत्या. दुपारी साडेचार ते साडेपाचच्या सुमारास भालचंद्र किसन सुरवसे (वय 55) व त्याच्या मुलाने बबिता यांच्यासोबत वाद घातला. सामाईक विहिरीचे पाणी पिकास देण्यावरुन हा वाद सुरु होता. यावरुन त्यांच्यात यापूर्वीही वाद झाले होते. त्याची कुरापत काढून बबिताला मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी या दोघांनीही मृतदेह विहिरीत टाकून दिला, अशी फिर्याद सतीश सुरवसे यांनी दिली. त्यानंतर या दोघांवरही खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. भालचंद्र यांच्या मुलाच्या वयाची खातरजमा पोलिस करीत आहेत.