होमपेज › Solapur › विवाहितेचा छळ करून खून; पतीसह 5 जणांना जन्मठेप

विवाहितेचा छळ करून खून; पतीसह 5 जणांना जन्मठेप

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

टमटम घेण्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिचा खून केल्याप्रकरणी पतीसह  पाच जणांना येथील अतिरिक्‍त सत्र न्यायाधीश श्रीमती आ. व्ही. सावंत-वाघुले यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

पती  बरगालसिद्ध  धर्मण्णा पडवळे (वय 27), सासू सुगलाबाई धर्मण्णा पडवळे (49), सासरे धर्मण्णा लक्ष्मण पडवळे (59), दीर  शिवाजी धर्मण्णा पडवळे (32) व कुशालाबाई भौरप्पा कोरे (67, सर्व रा. मंद्रुप, ता. दक्षिण सोलापूर) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. अश्‍विनी बरगालसिद्ध पडवळे (19, रा. मंद्रुप) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत मृत अश्‍विनीची आई संगीता बनसिद्ध देशमुख यांनी फिर्याद दिली होती.

मंद्रुप येथे राहणार्‍या अश्‍विनीचा विवाह गावातीलच बरगालसिद्ध याच्याशी 29 मे 2013 रोजी झाला होता. लग्‍नानंतर अश्‍विनीचा पती बरगालसिद्ध, सासू सुगलाबाई, सासरे धर्मण्णा, दीर शिवाजी व अश्‍विनीच्या पतीची आजी कुशालाबाई कोरे हे सर्व जण अश्‍विनी घरातील कामे व्यवस्थित करीत नाही, शेतात मजुरीने कामास जात नाही, बरगालसिद्ध यास टमटम घेऊन द्या म्हणून सतत मारहाण करून तिचा शारीरिक वमानसिक छळ करीत होते.  बरगालसिद्ध याने टमटम घेऊन द्या नाही तर तुमच्या मुलीला सोडणार नाही, जीवच मारतो व जेल भोगतो, अशी धमकी दिली होती.

त्यानंतर 5 जून 2014 रोजी सकाळी अश्‍विनी ही तिच्या सासरच्या घरी जळालेल्या अवस्थेत मिळाल्याची माहिती तिच्या आई-वडिलांना मिळाल्यानंतर त्यांनी घरी जाऊन पाहणी केली असता ती मृत झाली होती. याबाबत संगीता देशमुख यांच्या फिर्यादीवरून मंद्रुप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी सासरच्या सर्व पाच जणांना अटक करून तपास केला व न्यायालयात दोषारोपपत्र पाठवून दिले.

या खटल्यात सरकारच्यावतीने 7 साक्षीदार तपासण्यात आले. शवविच्छेदन अहवाल, साक्षीदारांच्या साक्षी व सरकारी वकिलांचा युक्‍तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने सर्व आरोपींना जन्मठेप व 20 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

याप्रकरणी सरकारच्यावतीने अ‍ॅड. वामनराव कुलकर्णी, फिर्यादीच्यावतीने अ‍ॅड. मिलिंद थोबडे, अ‍ॅड. राजकुमार मात्रे यांनी, तर आरोपींच्यावतीने अ‍ॅड. व्ही. डी.  फताटे यांनी काम पाहिले.