Thu, Aug 13, 2020 17:43होमपेज › Solapur › संस्था तीस हजार, संस्थांचे ऑडिट तीन हजार

संस्था तीस हजार, संस्थांचे ऑडिट तीन हजार

Published On: Dec 01 2017 9:08AM | Last Updated: Nov 30 2017 10:35PM

बुकमार्क करा

सोलापूर : श्रीकांत साबळे

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयांतर्गत जिल्ह्यात तब्बल तीस हजार संस्थांची कागदोपत्री नोंदणी आहे; परंतु प्रत्यक्षात फक्‍त तीन हजार संस्थांनीच आपला लेखापरीक्षण अहवाल कार्यालयाकडे सादर केला आहे. त्यामुळे उर्वरित संस्थांना का आणि कशासाठी अभय दिले जात आहे, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या वतीने शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी संस्थांची नोंदणी करणे कायद्याने बंधनकारक आहे. या संस्थांची अधिकृत नोंदणी केल्यास शासनाकडून मिळणारे विविध लाभ या संस्थांना मिळू शकतात. जिल्ह्याचा विचार केला तर याठिकाणी जवळपास तीस हजारांहून अधिक संस्थांची नोंदणी न्यास नोंदणी कार्यालयाकडे 1 ऑगस्ट 2017 अखेर करण्यात आलेली आहे. एखाद्या संस्थेची नोंदणी केल्यानंतर दरवर्षी संबंधित संस्थेने आपला लेखापरीक्षण अहवाल कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे; परंतु या जिल्ह्यातील फक्‍त तीन हजारांच्या आसपासच संस्थांनी आपला लेखापरीक्षण अहवाल ऑनलाईन पद्धतीने सादर केल्याचे उघड झाले आहे. 

न्यास नोंदणी कार्यालय शासनाच्या विविध योजनांचा कोट्यवधी रुपयांचा अनुदानरूपी निधी हडप करणार्‍यांना का पाठीशी घालत आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, कार्यालयाने यापूर्वीच लेखापरीक्षण अहवाल सादर करण्याचे आदेश सर्वच संस्थांना दिले आहेत, अशी माहिती कार्यालयाकडून देण्यात आली.न्यास नोंदणी केलेल्या संस्था कोट्यवधी रुपयांचे अनुदान शासनाकडून लाटत असते. अशा संस्थांचे लेखापरीक्षण न आल्यास त्या संस्था रद्द कराव्यात असा दंडक असताना या संस्थांना अभय का दिले जात आहे.  
- दीनानाथ काटकर, माहिती अधिकार कार्यकर्ता