Sat, Sep 19, 2020 12:23होमपेज › Solapur › गोल्डन मॅन कामाठा सोनीला फसवणूकप्रकरणी कोठडी

गोल्डन मॅन कामाठा सोनीला फसवणूकप्रकरणी कोठडी

Last Updated: Sep 17 2020 2:15AM
सोलापूर : पुढारी वृत्तसेवा 

विराट फ्युचर कंपनीत मोठ्या रकमेची गुंतवणूक करणार्‍या गुंतवणूकदारांना जास्त व्याज देण्याचे आमिष दाखवून सोलापुरातील 7 जणांची 34 लाखांची फसवणूक केल्या प्रकरणातील मुख्य आरोपी ‘गोल्डन मॅन’ कामाठा सोनी याला सोलापूरच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पनवेल येथून मंगळवारी रात्री उचलले. पोलिसांनी त्याला बुधवारी सोलापूर न्यायालयासमोर उभे केले असता त्याला न्यायाधीशांनी 23 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

विराट फ्युचर कंपनीत मोठी रक्कम गुंतविल्यास जास्त व्याज देण्याचे आमिष दाखवून, कंपनीचा मास्टर माईंड मुंबईचा कामाठा सोनी व मोहोळचा फजलोद्दीन डोंगरी या दोघांनी सोलापूरच्या 7 जणांची 34 लाख रुपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणी जरीना फिरोज पठाण यांनी 10 ऑगस्ट रोजी विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी कामठा हरिदास सोनी (रा. पनवेल, नवी मुंबई) व फजलोद्दीन फकरोद्दीन डोंगरी (रा. मोहोळ) या दोघांविरूध्द गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी कामठा सोनी हा फरार होता. त्याला अटक करण्यासाठी सोलापूरच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पथक 15 सप्टेंबर रोजी  मंगळवारी मुंबई, पनवेल येथील सोनी याच्या घरी रात्री पोहोचले व गोल्डन मॅनला ताब्यात घेतले. त्याला सोलापुरात आणल्यानंतर 16 सप्टेंबर रोजी सोलापूरच्या न्यायालयात उभे केले. न्यायाधीशांनी सोनी याला 23 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

या प्रकरणात अटकेत असलेल्या  फजलोद्दीन डोंगरी याने या जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तो कोर्टाने फेटाळला.

तक्रारदारांची संख्या वाढण्याची शक्यता

विराट फ्युचर कंपनीत आतापर्यंत 7 जणांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मुख्य आरोपी सोनी याला अटक केल्यानंतर आणखीन तक्रारदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. फसवणुकीची रक्कम ही करोडोंच्या घरात जाण्याची शक्यता आहे, असा युक्तिवाद ऐकून न्यायाधीशांनी सोनी याला 23 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.    

 "