Mon, Sep 21, 2020 17:07होमपेज › Solapur › वडिलांकडूनच मुलाच्या खुनाची सुपारी

वडिलांकडूनच मुलाच्या खुनाची सुपारी

Last Updated: Feb 15 2020 12:56AM
सोलापूर : पुढारी वृत्तसेवा 

घरात सर्वांना त्रास देतो व शेतातील वाटणी मागतो म्हणून वैतागलेल्या सुरेश घोडके यांनीच त्यांचा मुलगा शैलेश घोडके याला ठार मारण्यासाठी सुपारी दिल्याची कबुली दिली आहे. दरम्यान, याप्रकरणी मृत शैलेशचे वडील सुरेश घोडकेसह चौघांना कोर्टाने 17  फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी गावात राहणारा शैलेश सुरेश घोडके (वय 31, रा. मार्डी, ता. उत्तर सोलापूर) याचा  अज्ञातांनी अज्ञात कारणावरून दोरीने गळा दाबून खून केला होता. शैलेश याचा मृतदेह 29 जानेवारी 2020 रोजी कुंभारी येथील जमादार वस्तीजवळ सकाळी 7.30 वाजता वळसंग पोलिसांना आढळला होता. हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण सावंत यांना आरोपी शोधण्याचे आदेश दिले होते. 

या गुन्ह्याचा तपास करताना पो.नि. अरुण सावंत यांना बातमीदारामार्फत समजले की, मृत शैलेश हा घरामध्ये सर्वांनाच त्रास देत होता. तो वडिलांना शेतात वाटणी मागत होता. त्यामुळे वैतागून शैलेशचे वडील सुरेश घोडके यांनीच 1 महिन्यापूर्वी त्यांच्या ओळखीचे शंकर वडजे व राहुल राठोड यांनाच मुलगा शैलेश याला जीवे मारण्यासाठी 2 लाख रुपयांची सुपारी दिली होती. ही खात्रीलायक बातमी मिळताच पो.नि. सावंत व त्यांच्या पथकाने 13 फेब्रुवारी रोजी मृत शैलेश याचे वडील सुरेश घोडके व शंकर वडजे या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी केली. तेव्हा शंकर वडजे याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तेव्हा पोलिसांचा त्यांच्यावर जास्तच संशय वाढला. तेव्हा पोलिसांनी शंकर वडजे याला गोडीत घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला. मृताचे वडील सुरेश याने शंकर वडजे व त्याच्या साथीदारांना शैलेश याला  संपविण्यासाठी महिन्याभरापूर्वीच सुपारी दिली होती. कारण शैलेश हा घरात सर्वांनाच त्रास देतो, शेत नावावर करून दे म्हणून दमदाटी करत होता. 

यानंतर पोलिसांनी  या गुन्ह्यात संजय ऊर्फ भोजू राठोड (वय 28, रा. मुळेगाव), शंकर नारायण वडजे (वय 47, रा. सेवालालनगर तांडा, ता. उत्तर सोलापूर), राहुल चंदू राठोड (वय 28, रा. मुळेगाव तांडा, ता. दक्षिण सोलापूर) आणि मृत तरूणाचे वडील सुरेश सिद्धलिंग घोडके (वय 62,  रा. मार्डी, ता. उत्तर सोलापूर) अशा चौघांना   14 फेब्रुवारी रोजी अटक केली. त्यांना अक्‍कलकोट कोर्टापुढे उभे केले असता न्यायाधीशांनी 17 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पोलिसांनी या गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त केले आहे.
ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. अरूण सावंत व त्यांच्या पथकाने पार पाडली.

 "