Wed, Jan 27, 2021 09:20होमपेज › Solapur › क्रीडाधिकारी नजीर शेख यांच्या बडतर्फीचा स्थायीचा ठराव

क्रीडाधिकारी नजीर शेख यांच्या बडतर्फीचा स्थायीचा ठराव

Published On: Dec 02 2017 10:30PM | Last Updated: Dec 02 2017 10:04PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी
महापालिकेच्या क्रीडा विभागाकडील लेखापरीक्षण अहवालात विविध चुकीच्या बाबींसंदर्भात क्रीडाधिकारी नजीर शेख यांच्यावर ठपका ठेवण्यात आल्याने त्यांना बडतर्फ करण्याचा ठराव शनिवारी महापालिका स्थायी समितीच्या सभेत एकमताने घेण्यात आला. 

सभापती संजय कोळी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. स्टेडिअम कमिटीच्या अनेक कामांसंदर्भात अनियमितता असल्याचे लेखापरीक्षणात नमूद करण्यात आले आहे. यामध्ये क्रीडाधिकारी नजीर शेख यांना या अनियमिततेला जबाबदार धरण्यात आले आहे. पार्क स्टेडियममधील गाळा नं. 6 चे झालेले बेकायदेशीरपणे झालेले हस्तांतरण, 35 नंबर गाळ्याचे चटई क्षेत्र कमी असताना या गाळ्याला भाडे जास्त, तर नजीकच्या 36 व 37 नंबरच्या गाळ्यांचे चटई क्षेत्र जादा असताना त्याला  कमी आकारलेले भाडे आदी विविध मुद्यांवर शेख यांना जबाबदार धरण्यात आले आहे.  हा अहवाल माहितीस्तव स्थायी समितीकडे पाठविण्यात आला होता. यावर चर्चा करताना सत्ताधारी भाजपने क्रीडाधिकारी नजीर शेख यांच्या बडतर्फीची व मनपाचे झालेले नुकसान त्यांच्याकडून वसूल करण्याची सूचना मांडली. विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेचे सदस्य गुरुशांत धुत्तरगावकर यांनीदेखील सूचनेचे समर्थन करणारी उपसूचना मांडली. त्यास एकमताने मंजुरी देण्यात आली. 

आयुक्तांच्या अभिनंदनाचा ठराव

या सभेत शिवसेनेचे सदस्य धुत्तरगावकर यांनी अँटीरेबीजच्या ओव्हर डोसबाबत प्रभारी आरोग्याधिकारी जयंती आडके यांना निलंबित केल्याबद्दल आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्या अभिनंदनाचा, तर  या विषयाबाबत एका दैनिकाच्या कार्यालयात जाऊन संबंधित पत्रकाराला आडके यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या धमकीच्या निषेधाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला एकमताने मंजुरी देण्यात आली. या सभेत फेरीवाला फीमध्ये 21 टक्के वाढ तसेच दंड कमी करण्याचा प्रशासनाचा विषय होता.  सत्ताधार्‍यांनी 10 टक्के वाढ करण्याचा ठराव केला. बसपचे आनंद चंदनशिवे यांनी या  प्रस्तावाला जोरदार विरोध केला.