Wed, Aug 12, 2020 12:23होमपेज › Solapur › भीमा कोरेगाव प्रकरणाचे सोलापुरात पडसाद, बस पेटवली

भीमा कोरेगाव प्रकरणाचे सोलापुरात पडसाद, बस पेटवली

Published On: Jan 02 2018 11:34AM | Last Updated: Jan 02 2018 11:36AM

बुकमार्क करा
सोलापूर/श्रीपूर : प्रतिनिधी

भीमा कोरेगाव विजयदिन साजरा होत असताना सणसवाडी गावाच्या परिसरात दोन गटांमध्ये निर्माण झालेल्‍या तणावाचे पडसाद सोलापूर जिल्ह्यासह शहरात उमटण्यास सुरूवात झाली आहे. मंगळवारी सकाळी श्रीपूर (ता. माळशिरस) येथे अज्ञातांनी एक बस पेटवली. तर, सोलापूर शहरात दोन ठिकाणी दगडफेकीच्या किरकोळ घटना घडल्या आहेत. तणावाची शक्यता गृहित धरुन पोलिसांनी सर्वच ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. 

पेरणेफाटा  (ता. हवेली) येथे सोमवारी विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी जमलेल्या लाखो भीम अनुयांनीवर एका गटाने दगडफेक केली होती. यानंतर याठिकाणी तणाव निर्माण झाला होता. या घटनेचे सोलापुरात मंगळवारी सकाळपासून पडसाद उमटण्यास सुरूवात झाली आहे. माळशिरस तालुक्यातील श्रीपूर याठिकाणी अज्ञातांनी दगडफेक करुन एक बस जाळली. तर सोलापूर शहरातील दयानंद महाविद्यालयाजवळ एका गटाने अचानक दगडफेक केली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने या परिसरातील तणाव निवळला आहे. याशिवाय माळशिरस, अकलूज, बार्शी, पंढरपूर, कुर्डूवाडी, सांगोला यासह सोलापूर शहरातील काही भागांमध्ये कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. कोणत्याही प्रकारचा अनूचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून शर्तीचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. वरिष्ठ पोलिस अधिकारीही जिल्ह्यातील स्थितीवर लक्ष ठेवून आहेत. 

दरम्यान, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही काही कामगारांनी तसेच हमालांनी या घटनेचा निषेध म्हणून लिलावासाठी आलेला कांदा उतरुन घेतला नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे बाजार समितीत काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.