होमपेज › Solapur › श्‍वानदंशाचे ‘ओव्हर’ डोस आरोग्याधिकार्‍यांना भोवले 

श्‍वानदंशाचे ‘ओव्हर’ डोस आरोग्याधिकार्‍यांना भोवले 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून श्‍वानदंश लसीचे ‘ओव्हर’ डोस देण्याचा गंभीर प्रकार प्रभारी आरोग्याधिकारी डॉ. जयंती आडके यांचा भोवला आहे. यासह एकूण तीन कारणांसाठी महापालिका आयुक्‍त डॉ. अविनाश ढाकणे यांनी डॉ. आडके यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. 

शिवसेनेचे नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी श्‍वानदंश लसीच्या ओव्हर डोसचा विषय उपस्थित केला होता. कुत्रा चावलेल्या माणसावर शासकीय रुग्णालयात केवळ 0.8 एम.एल. इतकी लस दिली जात असताना मनपाच्या दवाखान्यांमध्ये मात्र याच्या तिप्पट लस दिली जात असल्याची गंभीर बाब धुत्तरगावकर यांनी उजेडात आणली होती. याविषयी त्यांनी आयुक्तांना पत्रही दिले होते. याची गंभीर दखल घेत आयुक्तांनी डॉ. जयंती आडके यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. अधिकचा डोस जास्त देण्यासाठी अँटी रेबीजची जादा खरेदी करावी लागली. यामुळे मनपाचे नुकसान झाल्याचा ठपका डॉ. आडके यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 

रात्री 12 च्या सुमारास निलंबनाच्या पत्रावर सही

महापालिका आयुक्‍त डॉ. ढाकणे यांनी सोमवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास निलंबन आदेशावर सही केली. ओव्हर डोसशिवाय अन्य दोन कारणांसाठीदेखील डॉ. आडके यांचे निलंबन करण्यात आले आहे. मालन जाधव यांचे नाव अनुकंपा तत्त्वाखालील झाडुवाली या पदाच्या प्रतीक्षा यादीत समाविष्ठ करण्यास आयुक्‍तांनी मान्यता दिलेली होती. मात्र  डॉ. आडके यांनी हे पद रिक्‍त नसतानाही स्वत:च्या अधिकारात परिविक्षा कालावधीकरिता बेकायदेशीरपणे भरले. आर.सी.एच. व कुटुंबकल्याण योजनांकडील लाभार्थ्यांना शासन अनुदान वेळेवर देण्याची जबाबदारी डॉ.आडके यांनी पार पाडली नाही, असे निलंबन आदेशात म्हटले आहे.

जिल्हा आरोग्याधिकार्‍यांकडे देणार पदभार

डॉ. आडके यांना निलंबित केल्यानंतर नगरसेवक धुत्तरगावकर यांनी मंगळवारी आयुक्‍त डॉ. ढाकणे यांची भेट घेतली. डॉ. आडके यांना एक वरिष्ठ अधिकारी पाठीशी घालत असल्याची तक्रार करीत आरोग्याधिकारीपदाचा प्रभार आयुक्‍तांनी स्वत:कडे ठेवावा, अशी मागणी धुत्तरगावकर यांनी याप्रसंगी केली. यावर आयुक्‍तांनी आरोग्याधिकारीपदाचा प्रभार जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांकडे देणार असल्याचे स्पष्ट केले. 

दरम्यान, श्‍वानदंशावर शासकीय रुग्णालयाच्या धर्तीवर  इंट्राडर्मल पद्धतीने लस देण्याचे आदेश आयुक्‍तांनी आरोग्य विभागाला दिल्याची माहिती आहे. याविषयी धुत्तरगावकर यांनी समाधान व्यक्‍त केले आहे.