Wed, Aug 12, 2020 21:31होमपेज › Solapur › दत्त जयंती भक्‍तिभावात

दत्त जयंती भक्‍तिभावात

Published On: Dec 04 2017 1:33AM | Last Updated: Dec 03 2017 10:19PM

बुकमार्क करा

अक्‍कलकोट : प्रतिनिधी  

अक्‍कलकोट निवासी दत्तावतारी श्री स्वामी समर्थ महाराजांचे मूळस्थान असलेल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात रविवारी श्री दत्त जयंती भक्‍तिभावात साजरी करण्यात आली.रविवारी  पहाटे 5 वाजता मंगलमय वातावरणात देवस्थानचे पुरोहित मोहन महाराज पुजारी यांच्या हस्ते व मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या उपस्थितीत श्रींची काकडआरती करण्यात आली. त्यानंतर स्वामिभक्‍तांना दर्शनाकरिता मंदिर खुले करण्यात आले. भक्‍तांच्या गर्दीमुळे नित्यनियमाने होणारे अभिषेक बंद ठेवण्यात आले होते. सकाळी साडेअकरा वाजता देवस्थानात श्रींचा नैवेद्य, आरती सोहळा  पार पडला. 

दत्त जयंतीनिमित्त राज्याच्या कानाकोपर्‍यातून दिंडी व पालखीसोबत चालत निघालेली भक्‍तांची स्वारी अक्‍कलकोटी विसावली. यामध्ये पुणे, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, घाटकोपर, भांडुप-मुंबई, बार्शी, भातम्बरे इत्यादी परगावाहून येणार्‍या पालखी व दिंडीचा सहभाग होता. या दिंडी व पालखीसोबत आलेल्या  भक्‍तांची  प्रसादाची व निवासाची सोय देवस्थानच्या वतीने करण्यात आली होती. पहाटे 5 वाजल्यापासून ते रात्री 10 पर्यंत दिवसभरात हजारो भक्‍तांनी दत्तावतारी स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. दर्शन सुलभ होण्याकरिता मंदिर समितीच्या वतीने भक्‍तांना टप्प्याटप्प्याने दर्शनास सोडण्यात आले. 
सायंकाळी 4 ते 5.30 या वेळेत देवस्थानच्या विश्‍वस्त उज्ज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली सत्संग महिला भजनी मंडळाच्या वतीने दत्त जन्म आख्यान, वाचन, व दत्तसंप्रदायिक भजन होऊन सायंकाळी 6 वाजता पुरोहित मोहन पुजारी व मंदार महाराज यांच्या हस्ते पाळणापूजन व चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते आरती होऊन दत्त जन्म सोहळा ज्योतिबा मंडपात पार पडला. सायंकाळी 6 वाजता देवस्थानच्या भक्‍तनिवास येथे सावरगावचे कीर्तनकार ह.भ.प. सचिन महाराज जोशी यांची गुलालाची कीर्तनसेवा स्वामींच्या चरणी समर्पित झाली. या सोहळ्याप्रसंगी समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्‍वस्त विलासराव फुटाणे, महेश गोगी, संपतराव शिंदे, दयानंद हिरेमठ, विजय दास, प्रदीप झपके, उज्ज्वलाताई सरदेशमुख, गिरीश पवार, अविनाश क्षीरसागर, ऋषिकेश लोणारी, मोहन जाधव, जयप्रकाश तोळनुरे, सागर गोंडाळ, महेश मस्कले, अमर पाटील आदी उपस्थित होते.