Sun, Aug 09, 2020 02:40होमपेज › Solapur › अ‍ॅड. कांबळे यांची हत्याच

अ‍ॅड. कांबळे यांची हत्याच

Published On: Jun 13 2019 1:37AM | Last Updated: Jun 12 2019 11:16PM
सोलापूर : प्रतिनिधी

गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेले अ‍ॅड. राजेश कांबळे यांचे दोन पाय, दोन हात व मुंडके छाटून त्यांचा निर्घृण खून करून अज्ञात आरोपीने मृतदेहाच्या पाच तुकड्यांसह त्यांचे पार्थिव एका पोत्यात भरून ठेवले होते. दुर्गंधी सुटलेला हा मृतदेह एका बंद घरात आढळून आल्यानंतर सकाळपासून शहरात एकच खळबळ उडाली होती. हा मृतदेह बेपत्ता अ‍ॅड. कांबळे यांचाच असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या शर्टच्या टेलर मार्कवरून पोलिसांना सांगत मृतदेहाची ओळख पटवली आहे. 

सविस्तर वृत्त असे की, विजापूर रोडवरील ब्रह्मचैतन्यनगरात राहणारे अ‍ॅड. राजेश श्रीमंत कांबळे (वय 44) हे 8 जून रोजी पक्षकाराकडे जाऊन येतो म्हणून गेले ते परत आलेच नाहीत. त्यानंतर अ‍ॅड. कांबळे यांच्या कुटुंबीयांनी व वकील मंडळींनी एकमेकांना फोन करून तसेच सर्वत्र चौकशी केली; परंतु, अ‍ॅड. राजेश  कांबळे यांचा पत्ता लागला नाही. शेवटी अ‍ॅड. कांबळे यांच्या घरच्यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्यांचा शोध सुरूच होता. अ‍ॅड. राजेश कांबळे हे सोलापूर बार असोसिएशनचे सदस्य होते. त्यामुळे सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. संतोष न्हावकर व बारच्या पदाधिकार्‍यांनी 11 जून रोजी पोलिस आयुक्‍तांना निवेदन देत बेपत्ता अ‍ॅड. कांबळे यांचा शोध घ्यावा आणि अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍त पदाच्या अधिकार्‍यांकडे तपास द्यावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर अ‍ॅड. कांबळे यांच्या शोधाला पोलिसांनी वेग दिला होता. दिनांक 12 जून रोजी सकाळी तालुका पोलिस ठाण्यामागे असलेल्या पांडुरंग वस्तीत राहणारा बंटी खरटमल याच्या बंद घरातून घाण वास येत असल्याने शेजारच्या लोकांनी सदर बझार पोलिसांना फोन केला. तेव्हा सदर बझार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र बहिरट, डी. बी. पथकाचे फौजदार कोकरे आणि त्यांचे पथक यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा पोलिसांची गाडी पाहून पांडुरंग वस्तीतील रहिवाशांची गर्दी वाढू लागली. पोलिसांनी हे घर कोणाचे आहे, ते कोठे गेले आहेत, याची चौकशी केली. घरी कुणीही नसल्याने पोलिसांनी शेवटी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. तेव्हा  पोलिसांना घरात ठेवलेल्या एका पोत्यातून घाण वास येत असल्याचे जाणवले. तेव्हा पोलिसांनी शासकीय रुग्णालयाची अ‍ॅम्ब्युलन्स मागविली. ती घेऊन बैतुनमाल शिफा कमिटीचे अध्यक्ष जहाँगीर शेख व त्यांचे सहकारी आले. पोलिसांसह शेख यांनी ते पोते उघडले असता त्यांच्या हाती प्रथम माणसाचा एक तोडलेला हात आला. त्यांनतर संपूर्ण पोते उघडले असता गुडघ्यापासून तोडलेले दोन पाय, तोडलेले दोन हात आणि तोडलेले मुंडके असा मृतदेह आढळला. या घटनेमुळे पोलिस अधिकारीसुद्धा चक्रावलेे. 

बंटी खरटमल याच्या बंद घरात पाच तुकडे केलेला मृतदेह आढळला ही बातमी वार्‍यासारखी पसरली. लगेच घटनास्थळी सहाय्यक पोलिस आयुक्‍त सकळे, गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्‍त अभय डोंगरे तसेच इतर अधिकार्‍यांनीसुद्धा धाव घेतली. यावेळी पोलिसांनी फिंगर प्रिंट पथकाला पाचारण केले. इथूनच पोलिसांचा शोध सुरू झाला. यावेळी पोलिसांना प्रथम विजापूर नाका पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या मिसिंगचा तपास केला. त्यावेळी विजापूर नाका पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या मिसिंगमधील व्यक्‍तीचे कपडे आणि इतर वर्णन पाहिले आणि अ‍ॅड. राजेश कांबळे यांच्या नावाने मिसिंग दाखल असल्याने अ‍ॅड. कांबळे यांच्या भावाला बोलविण्यात आले. मृताचे शरीर कुजल्याने फुगलेले असल्याने अ‍ॅड. कांबळे यांच्या भावाला चेहरा ओळखू आला नाही. त्यानंतर पोलिसांनी जागेवरच पंचनामा केला आणि पाच तुकडे असलेला मृतदेह अ‍ॅम्ब्युलन्समधून शासकीय रुग्णालयातील शवविच्छेदन विभागाकडे पाठवून दिला. यानंतर अ‍ॅड. राजेश कांबळे यांच्या घरच्या लोकांना पोलिसांनी त्यांचे कपडे दाखविले असता शर्टच्या टेलर मार्कवरून मृतदेह ओळखला  आणि 5 तुकडे झालेला मृतदेह हा अ‍ॅड. राजेश कांबळे यांचाच असल्याची पोलिसांची खात्री झाली. यावेळी शासकीय रुग्णालयात बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. संतोष न्हावकर, बारचे इतर पदाधिकारी व वकील मंडळींची तसेच अ‍ॅड. राजेश कांबळे यांच्या नातेवाईकांची गर्दी झाली होती.

मृतदेहाच्या शरीरावर असलेल्या शर्टच्या टेलर मार्कवरून त्यांच्या नातेवाईकांनी हा मृतदेह अ‍ॅड. कांबळे यांचाच असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर कांबळे यांच्या खुनाच्या अनुषंगाने पोलिसांनी लगेचच तपासाला सुरुवात केली. 

खुनाचे नेमके कारण काय?
अ‍ॅड. राजेश कांबळे यांच्या शरीराचे पाच तुकडे करून खून करण्यात आला, याचे नेमके कारण काय? याचा पोलिस तपास करत आहेत. पोलिस तपासात खून कोणी आणि कोणत्या कारणामुळे केला हे लवकरच समजेल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

मृतदेह नातेवाईकांनी ओळखला : एसीपी 
पांडुरंग वस्तीमध्ये बंटी खरटमल याच्या घरात पोत्यात सापडलेला मृतदेह हा अ‍ॅड. राजेश कांबळे यांचाच आहे. हा मृतदेह अ‍ॅड. कांबळे यांच्या नातेवाईकांनी ओळखला आहे.  विजापूर नाका पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या मिसिंगमधील वर्णनसुद्धा पोत्यात सापडलेल्या मृतदेहाशी जुळते आहे. शर्टाच्या टेलर मार्कवरूनसुद्धा तो मृतदेह अ‍ॅड. राजेश कांबळे यांचाच आहे हे पोलिस तपासात सिद्ध झाले आहे, अशी माहिती सहायक पोलिस आयुक्‍त अभय डोंगरे यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना दिली.