Fri, May 07, 2021 19:07होमपेज › Solapur › मालवाहतूक कंटेनरची केमिकल टँकरला धडक

मालवाहतूक कंटेनरची केमिकल टँकरला धडक, दोन्ही वाहने जळाली

Last Updated: Nov 22 2020 4:42PM
मोहोळ : तालुका प्रतिनिधी

केमिकल टँकर आणि मालवाहतूक कंटेनरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्हीही वाहने जळून खाक झाली. हा अपघात रविवारी (दि.२२) सकाळी साडेदहा वाजता मोहोळ विजापूर महामार्गावर शहरापासून तीन किमी अंतरावर घडला. या अपघातात लाखो रुपयांची वित्तहानी झाली असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात करण्यात आली आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, रविवारी सकाळी साडेदहा वाजता केमिकल टँकर (एम.एच ६३ बी.पी. २९०८ ) मोहोळ विजापूर महामार्गाने कुरुलच्या दिशेने निघाला होता. यावेळी मोहोळ पासून तीन किमी अंतरावर असलेल्या छावा ढाब्या शेजारील वळण घेताना मोहोळच्या दिशेने येणाऱ्या मालवाहतूक कंटेनरची (एच.आर ३८ यु. ६१२२) केमिकल टँकरला जोराची धडक बसल्याने भीषण अपघात झाला. यामुळे टँकर मधील केमिकलची गळती होऊन दोन्ही वाहनाला भीषण आग लागली. यावेळी स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत वाहन चालकांना दरवाजा तोडून बाहेर काढले त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. टँकरमधील होणारी केमिकलची गळती पाहता पोलिसांनी अग्निशामक दलाला पाचारण केले. लोकनेते कारखाना आणि सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांच्या तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आली. तोपर्यंत दोन्ही वाहने जळून खाक झाली. मालवाहतूक कंटेनरमध्ये महागड्या गाड्यांचे असणारे स्पेअर पार्ट देखील या आगीत जळून खाक झाले आहे. त्यामुळे अंदाजे ७० ते ८० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

पोलिसांनी मोहोळ विजापूर महामार्गावरील वाहतूक रोखल्यामुळे तब्बल चार किमी अंतरापर्यंत अवजड वाहनांच्या रांगाच्या रांगा लागल्या होत्या. या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात करण्यात आली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल अविनाश शिंदे हे करीत आहेत.