Thu, Jul 02, 2020 18:40होमपेज › Solapur › मतदानाचा टक्‍का वधारला!

मतदानाचा टक्‍का वधारला!

Published On: Apr 19 2019 1:53AM | Last Updated: Apr 19 2019 1:53AM
पंढरपूर : प्रतिनिधी

लोकसभेसाठी पंढरपूर शहर आणि तालुक्यात उत्साही वातावरणात मतदान झाले असून, विशेषत: ग्रामीण भागात 68 टक्क्यांपेक्षा जास्त तर पंढरपूर शहरात सुमारे 62 टक्के इतके मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. काही केंद्रांवर इव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड वगळता कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. सर्वत्र शांततेत मतदान झाले. दरम्यान, ग्रामीण भागात मतदानासाठी मोठा उत्साह असल्याचे दिसून आले. त्यामुळे वाढलेला मतांचा टक्‍का कुणाला देणार धक्‍का याविषयी चर्चा सुरू झाली आहे. 

लोकसभा मतदारसंघात पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर शहर आणि 22 गावे तर मोहोळ विधानसभेला जोडलेली 16 गावे यांचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्यातील सुमारे 38 गावे आणि पंढरपूर शहरातील 78 मतदान केंद्रांवर गुरुवारी सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली होती. शहरातील     तीन मतदान केंद्रांवर, मुंढेवाडी येथील एका केंद्रावर इव्हीएम मशिन बंद पडल्यामुळे तेथील मतदान प्रक्रिया सुमारे तासाभराने उशिरा सुरू झाली. मात्र, त्यानंतर दिवसभरात शहर आणि तालुक्यातही कुठे अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही. विधानसभा निवडणुकीप्रमाणे लोक मतदानासाठी बाहेर येत होते. दुपारी उन्हाच्या तडाख्यामुळे काही प्रमाणात मतदान केंद्रांवरील गर्दी कमी झाली होती. मात्र, 3 वाजल्यानंतर पुन्हा 6 वाजेपर्यंत मतदार घराबाहेर पडल्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढल्याचे दिसून आले. 

पंढरपूर तालुक्यातील सर्वच गावांमध्ये सरासरी 68 टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे कासेगाव, वाखरी, गादेगाव, फुलचिंचोली, चळे, पुळूज अशा मोठ्या गावांमध्येही 65 टक्क्यांपर्यंत मतदान झाले आहे. तर लहान गावांमधील मतदानाची आकडेवाडी 70 टक्क्यांच्या पुढे गेल्याचे दिसून आले. यावेळी निवडणूक रिंगणात काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे, भारतीय जनता पक्षाचे डॉ. जयसिद्धेश्‍वर स्वामी आणि वंचित बहुजन विकास आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर रिंगणात असल्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढल्याचे बोलले जात आहे. मात्र, ती कुणाच्या पारड्यात पडणार आणि कुणाला नडणार हे 23 मे रोजीच स्पष्ट होणार आहे. मात्र, ग्रामीण भागातील मतदारांचा कानोसा घेतला असता काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांना दिलासा देणारी ही टक्केवारी ठरणार असल्याचे बोलले जाऊ लागले आहे. 

पंढरपूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील काही गावांत झालेले मतदान आणि टक्केवारी कंसात अशी: 
1 ) चळे 4323 पैकी 2867  (65), 2) मुंढेवाडी (70), 3) आंबे 2600 पैकी 1870 (72),4)  वाखरी 4783 पैकी 2907 (61), 5) तावशी 3605 पैकी 2407 (66.57), 6) सरकोली 4200 पैकी 2714 (65), 7) एकलासपूर 1328 पैकी 983 (74), 8) सिद्धेेवाडी 1219 पैकी 1757 (70), 9) चिचुंबे 417 पैकी 304 (73.90), 10) खर्डी 5400 पैकी 3723 (69),11)  तनाळी (76),12) पुळूज 4580 पैकी 3182 (69.47),13) शिरढोण 1200 पैकी 900 (75),14) कौठळी 2832 पैकी 1971 (70), 15) अनवली 3400 पैकी 2072 (63),16)  कासेगाव 11,687 पैकी 8193 (70), 17) खरसोळी (71),18)  गादेगाव 5759 पैकी 4032 (70),19)  आंबेचिंचोली 1403 पैकी 1006 (72), 20) तपकिरी शेटफळ (65),21) बोहोळी 2737 पैकी 1945 (71.06), 22)  पुळूजवाडी 1635 पैकी 1097 (67), 23) शंकरगांव 900 पैकी 495 (55). 

शहरात 58.58 टक्के मतदान
पंढरपूर शहरात 78 मतदान केंद्रांवर सुमारे 58.58 मतदान झाले असून 81 हजार 921 मतदारांपैकी 48 हजार 132 मतदारांनी मतदानांचा अधिकार बजावला आहे. 2014 च्या तुलनेत शहरात सुमारे 3 टक्के वाढ झाल्याचे दिसून येते.