Thu, Jul 02, 2020 18:28होमपेज › Solapur › विधानसभा निवडणूक प्रचाराने गावगाडा तापू लागला

विधानसभा निवडणूक प्रचाराने गावगाडा तापू लागला

Last Updated: Oct 10 2019 11:57PM

संग्रहित छायाचित्रसांगोला : वार्ताहर 

सांगोला तालुक्यात विधानसभा निवडणुकीमुळे वातावरण दिवसेंदिवस रंगू लागल्यामुळे विविध पक्षांच्या उमेदवारांकडून आपापल्या चिन्हांचा प्रचार जोरात सुरू करण्यात आला आहे. काही ठराविक नेते व कार्यकर्ते निवडणुकीच्या प्रचारानिमित्त पुन्हा एकदा गावगाड्यात मताचे दान मागण्यासाठी सक्रिय झाले असल्याने एकप्रकारे निवडणुकीची दिवाळीच आली आहे. अनेक हौसे-गौसे कार्यकर्ते फिरू लागले आहेत. त्यामुळे अनेक गावगाड्यांतील चाणाक्ष मतदार अशा कार्यकर्ते व नेत्यांवर निशाणा साधत आहेत.

बहुतांशी मतदार हा ग्रामीण भागात राहत असल्यामुळे व प्रत्येक वाड्या-वस्त्यांवरील मतदान महत्त्वाचे असल्यामुळे प्रत्येकजण आपापल्या परीने गावांना गाव भेटी देत आहेत. शहरात ‘होम टू होम’ प्रचार करताना दिसून येत आहे. आकर्षक गाणी व प्रचाराची हातोटी वापरुन विरोधकांवर तीक्ष्ण टीका करुन मतदाराचे मताचे दान आपल्याच पदरात पडेल, यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रचारयंत्रणा राबविण्यात येत आहे.

आपल्या नेत्याने प्रत्यक्ष केलेली विकासकामे तर पडद्याआड राहून केलेली विकासकामे याचा प्रचार करुन आपण निवडून आल्यास तालुक्याचा विकास कसा करणार, हेही प्रचाराच्या माध्यमातून कार्यकर्ते मतदारांना सांगू लागले आहेत. ग्रामीण भागात राजकारणाचे खरे स्वरूप पाहावयास मिळते. ज्येष्ठ नागरिकांपासून ते युवा मतदार, महिला यांच्यातही यंदा मतदान  करायचे  कोणाला, याची चर्चा रंगत आहे. सकाळी  उठल्यानंतर घरापासून ते गावातील चावडीवर, पानटपरीवर, चहाच्या टपरीवर, हॉटेलवर, हेअर सलून दुकान यांसह विविध गावांत भरणार्‍या आठवडा बाजारातही निवडणुकीची चर्चा रंगत आहे. हळूहळू गावगाडाही निवडणुकीच्या रंगात न्हावून निघू लागला आहे.

गावातील व वाड्यावस्त्यांवर एरव्ही मयत, विवाहासाठी व विविध कामासाठी कधीतर येणारे कार्यकर्ते आता निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासूनच सकाळ-दुपार-संध्याकाळ-रात्रंदिवस वाड्यावस्त्यांवर व गावात हेलपाटे मारू लागले आहेत. निवडणूक हे गावपातळीवरच्या कार्यकर्त्यांसाठी जणू  एक  निष्ठा  दाखवून द्यावयाची सुवर्णसंधी असल्याने नेत्याच्या पुढे पुढे वावरताना दिसत आहेत. तर विरोधी पक्षाच्या गटात चालू असलेल्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून डावपेच कसे बदलायचे, याच्यावर गावातीलच बेरके पुढारी लक्ष ठेवून असल्याचे चित्र दिसून येते.

सोमवार, 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर 19 ऑक्टोबरपर्यंत निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा असाच उडत राहणार आहे. नेत्यांच्या या प्रचाराची भुरळ मतदारांना पडते का, हे मात्र गुरूवार, 24 ऑक्टोबर रोजी मतदानानंतरच स्पष्ट होणार आहे, हे मात्र नक्की.