Tue, Jul 07, 2020 18:48होमपेज › Solapur › बाजार समिती निवडणूक प्रचारात आरोप-प्रत्यारोपांच्या धडाडताहेत तोफा

दोन मंत्र्यांमुळे निवडणुकीत रंगत

Published On: Jun 25 2018 1:54AM | Last Updated: Jun 24 2018 8:49PMसोलापूर ः प्रशांत माने

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची यंदाची निवडणूक राज्याचे सहकारमंत्री सुभाष  देशमुख यांच्याविरोधात एका पॅनेलने राज्याचे परिवहन, कामगार व आरोग्य राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना सोबत घेत निवडणुकीच्या फडात रंगत आणली आहे. निवडणूक प्रचारात दोन्ही पॅनेलकडून आरोपांच्या फैरी झडल्या जात असताना दोन मंत्र्यांच्या वादात एकमेकांची उणीदुणी काढली जात आहेत. 

सहकारमंत्री सुभाष  देशमुख यांच्या मार्गदर्शनाखालील भाजप प्रणित श्री सिध्दरामेश्‍वर परिवर्तन पॅनलचा शुभारंभ नुकताच हत्तुर येथे पार पडला. त्यावेळी प्रचाराच्या सभेत  भाजपचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी थेट आपल्याच पक्षाच्या पालकमंत्र्यांवर हल्‍लाबोल चढवला. कोणती निवडणूक लढवावी याचे तारतम्य पालकमंत्र्यांना राहिले नसल्याची टीका त्यांनी केली. विद्यमान मंत्री असाल तर काँग्रेस आमदारांसोबतच्या बैठकीतून निषेध करून उठायला हवे होते. सत्तेच्या हव्यासापोटी पालकमंत्र्यांनी शेतकर्‍यांचा घात करण्याचा प्रयत्न केला. 

चार वर्षांच्या मंत्रिपद कार्यकाळात शेतकर्‍यांच्या मालाला भाव मिळावा म्हणून आवाज उठवला नाही, अशीही टीका प्रा. निंबर्गी यांनी पालकमंत्र्यांवर केली. आपल्याच पक्षाचे पालकमंत्री यांच्यावर सडेतोड टीका करताना शहराध्यक्षांना याचेही भान राहिले नाही की, आपण न कळत आपल्याच्या पालकमंत्र्यावर टीका करीत आहोत.

सहकार व पालकमंत्र्यांमधील वाद माहिती असतानाही शहराध्यक्षांनी बाजार समितीच्या निवडणुकीपूर्वीच या दोन मंत्र्यांमध्ये समझोता करण्याचा प्रयत्न का केला नाही.  एक जबाबदार विद्यमान मंत्री काँग्रेसच्या पॅनेलमध्ये जात असतानाही भाजपचे शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्षांनी बघ्याची भूमिका घेण्यामागचा हेतू काय, हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. 

एकूणच या निवडणुकीतील राजकीय परिस्थिती व विचित्र समीकरणे पाहता दोन्ही मंत्री मतदारांना संभ्रमात तर टाकत नाही ना, अशी शंका येणे रास्त आहे. कारण भाजपचा एक मंत्री काँग्रेससोबत, तर दुसरा मंत्री निवडणुकीत भाजप प्रणित स्वतंत्र पॅनेल उतरवतो. म्हणजे बाजार समितीची सत्ता कोणत्याही परिस्थितीत भाजपकडे आलीच पाहिजे, असे तर दोन्ही मंत्र्यांचे धोरण नसावे ना, अशी शंका व्यक्‍त झाल्यास आश्‍चर्य वाटायला नको.

काँग्रेसच्या पॅनेलकडून सहकारमंंत्री सुभाष देशमुख यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. शहरातील आरक्षित जागेवर घर बांधता, शेतकर्‍यांच्या नावावर बोगस कर्जे घेता, तरी इतरांवर खोटे आरोप करता. सहकारमंत्री तुम्हाला आरोप करण्याचा खरेच अधिकार आहे का, असा सवाल काँग्रेस पॅनेलमधील उमेदवार सुरेश हसापुरे यांनी केला. तर सहकारमंत्री देशमुख वैफल्यग्रस्त झाल्याचा टोला शिवसेनेचे नगरसेवक गणेश वानकर यांनी लगावला. 

हत्तुरच्या सभेत सहकारमंत्र्यांनी आपल्या भाषणात विरोधकांना लफंगे, औलाद असे शब्द वापरले. सहकारमंत्र्यांवर यापूर्वीही गंभीर आरोप झाले असल्याने ते त्यांनी विसरू नयेत. कर्जमाफीतही शेतकर्‍यांना खूप त्रास झाला असून हा त्रास शेतकरी  विसरलेले नसल्याची टीका वानकर यांनी केल्याची चर्चा आहे. भाजपचे शहराध्यक्ष यांनी आणि काँग्रेसचे हसापुरे व सेनेचे वानकर यांनी केलेली टीका प्रसारमाध्यमांतून प्रसिध्द झाल्यानंतर सध्या सोशल मीडियावरूनही फिरत आहे. सोशल मीडियाचा वापर संपूर्ण जगभर होत असल्याने आपसूकच दोन मंत्र्यांमधील या मतभेदाची जोरदार चर्चा सर्वत्र सुरू आहे.  विशेष म्हणजे भाजपच्या मंत्र्यांमधील वाद व टीका याची मजा विरोधक घेत आहेत.