Fri, Nov 27, 2020 10:53होमपेज › Solapur › चंद्रभागेत स्नान करण्यास बंदी

चंद्रभागेत स्नान करण्यास बंदी

Last Updated: Nov 22 2020 10:57PM
पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा

कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 21 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरपर्यंत चंद्रभागा नदीत स्नान करण्यास बंदी घालण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. यात्राकालावधीत खासगीवाले यांच्या रथोत्सवाची मिरवणूक  नगरप्रदक्षिणा मार्गावरून  साध्या पद्धतीने व सामाजिक अंतराचे पालन करून काढण्यात येईल याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी केली.    

कार्तिक वारी नियोजनाबाबत पंढरपूर येथील शासकीय निवासस्थान येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, प्रांताधिकारी सचिन ढोले, शमा पवार, उदयसिंह भोसले, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, पोलिस उपअधीक्षक दत्तात्रय पाटील, तहसीलदार वैशाली वाघमारे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विशाल बडे, डॉ. एकनाथ बोधले, डॉ. जयश्री ढवळे उपस्थित होते.

या वेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, पंढरपूर शहरात  भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी 24 नोव्हेंबरच्या  रात्री 12 वाजल्यापासून ते 26 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत पंढरपूर शहर व शहरालगतच्या 11 गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. मठामध्ये बाहेरील भाविक राहणार नाहीत. यासाठी नगरपालिका व पोलिस प्रशासनाने दक्षता घ्यावी. नगरपालिकेने व मंदिर समितीने सुरक्षितेच्यादृष्टीने आवश्यक तेथे बॅरेकेडिंग करावे. शासकीय निवासस्थान येथे सार्वजनिक बांधकाम विभागाने बॅरेकेडिंग करावे. मंदिर समितीने सर्व विधी पार पाडताना  कोरोनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे. आरोग्य विभागाने पुरेसा औषधसाठा व आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध ठेवाव्यात, अशा सूचनाही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी यावेळी दिल्या.

यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्विनी सातपुते म्हणाल्या,  कार्तिक वारीत बाहेरील भाविक व  नागरिक पंढरपुरात येऊ नये यासाठी पोलिस प्रशासनाकडून त्रिस्तरीय नाकाबंदी केली  आहे. संचारबंदीच्या कालावधीत शहरातील नागरिकांनी विनाकारण फिरु नये. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस शहरापासून अर्धा किलोमिटर अंतरावर थांबवून  प्रवाशांची तपासणी केली जाणार आहे. बाहेरील नागरिकांना अथवा भाविकांना तेथूनच परत पाठवण्यात येणार आहे. चंद्रभागा नदीत स्नानासाठी बंदी असल्याने चंद्रभागा घाटावर तसेच नदीपात्रात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी कार्तिक वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून  करण्यात आलेल्या व्यवस्थेची सविस्तर माहिती दिली. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी मंदिर समितीमार्फत करण्यात येणार्‍या व्यवस्थेची माहिती दिली.

प्रथमच स्नानास बंदी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माागील आषाढी यात्रादेखील प्रतीकात्मकच व मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली होती. त्यावेळी भाविकांना चंद्रभागा नदीत स्नान करण्यास परवानगी दिली गेली होती. मात्र, या कार्तिकी यात्रेत चंद्रभागा नदीत स्नान करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. हे पंढरीच्या यात्रेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत आहे.