पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा
लॉकडाऊन काळात गेल्या दोन महिन्यांपासून पंढरपूर शहर व तालुक्यात प्रशासकीय यंत्रणेने केलेल्या योग्य नियोजनामुळे कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता. मात्र, दि. 22 मे रोजी उपरी (ता. पंढरपूर) येथे एका 55 वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. कोरोनाबाधित पहिला रुग्ण आढळून आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली असून, रुग्ण आढळलेल्या ठिकाणापासून तीन कि.मी.चा परिसर सील करण्यात आला आहे.
दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेली श्री विठ्ठलाची पंढरी नगरी गेल्या दोन महिन्यांपासून प्रशासकीय यंत्रणेने केलेल्या योग्य नियोजनामुळे कोरोनामुक्त होती. मात्र, मुलूंड (मुंबई) येथून दि. 13 मे रोजी उपरी येथे आलेल्या एका 55 वर्षीय व्यक्तीला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले. या व्यक्तीबरोबर विनापरवाना आलेल्या अन्य 8 व्यक्तींना तलाठी रोहिणी पाटील, ग्रामसेवक बालाजी एलेवाड, पोलिस पाटील दत्तात्रय हेंबाडे, संग्राम नागणे यांच्याकडून जि.प. शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. यापैकी एक 55 वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्याचे निष्पन्न झाले. यामुळे सकाळी 11 वाजल्यापासून गाव पुर्णपणे बंद करण्यात आले आहे.
प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, पो. नि. प्रशांत भस्मे यांनी गावात येवून गाव सील केले. संपूर्ण गावात फवारणी करण्यात आली आहे. तसेच पोलिस, महसूल व आरोग्य विभागाचे अधिकारी उपरी गावामध्ये ठाण मांडून पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची यादी तयार करुन त्यांचा शोध घेत आहेत. या पॉझिटिव्ह व्यक्तींवर सोलापूर येथे उपचार सुरु आहेत.