Mon, Apr 06, 2020 09:50होमपेज › Solapur › कुटुंबातील जमिनीची विभागणी झाली सोपी

कुटुंबातील जमिनीची विभागणी झाली सोपी

Last Updated: Jan 24 2020 2:22AM
सोलापूर : पुढारी वृत्तसेवा 

कुटुंबातील जमिनीची विभागणी करताना होणारा त्रास आणि विलंब कमी करण्यासाठी संमतीने अभिलेख पोटहिस्सा या पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. यामुळे पोटहिस्सा विभागणी करण्याची प्रक्रिया सोपी झाली आहे.  त्यानुसार कामकाज केले जाणार असल्याने नागरिकांनी अभिलेख अद्ययावत करण्यासाठी उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयात संपर्क साधवा, असे आवाहन दक्षिण सोलापूरचे उपअधीक्षक किरण कांगणे यांनी केले आहे.

शेतजमिनीची खातेफोड करून वाटप करताना सर्व हिस्सेदारांना समान प्रमाणात जमीन येण्यासाठी मोजणी केली जाते. हे वाटप करताना कुटुंबातील कोणाचीही हरकत नसते. पण जमिनीची विभागणी करून सात/बारा उतार्‍यावर नोंदणी करण्याची प्रक्रिया वेळखाऊ आणि किचकट असल्याने अनेक कुटुंबांतील जमिनीचे वाटप होऊ शकत नाही. ही अडचण लक्षात घेऊन राज्याचे जमाबंदी आयुक्‍त एस. चोक्‍कलिंगम यांनी  18 नोव्हेंबर 2019 रोजी संमतीने अभिलेख पोटहिस्सा याबाबतचे  परिपत्रक जारी करून ही प्रक्रिया सोपी केली आहे.

संमतीने अभिलेख पोटहिस्सा प्रत्यक्ष जागेवर जाऊन मोजणी न करता कार्यालयातच केली जाते. सर्वसंमतीने उपविभाग करावयाच्या या कार्यपद्धतीचे नामकरण संमतीने अभिलेख पोटहिस्सा, असे करण्यात आले आहे. पोटहिस्सा मोजणीच्या कार्यपध्दतीत सुधारणा करण्यासाठी भूमिअभिलेख विभागाचे उपसंचालक श्याम खामकर यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गट स्थापन करण्यात आला होता. जास्त शेती क्षेत्र असलेल्या जमीनधारकांची विभागणी प्रक्रिया अधिक सहजसोपी होणार आहे, असे  कांगणे यांनी सांगितले.

या प्रक्रियेसाठी सर्व सहधारकांची स्वाक्षरी असलेला अर्ज, भूमापन क्रमांकातील सर्व उपविभागांचे चालू तीन महिन्यांतील सात/बारा उतारे, धारण जमिनीचे पोटहिस्सेदर्शक सहधारकांची स्वाक्षरी असलेला कच्चा नकाशा, गाव नमुना क्रमांक 7/12 वेगळा झाला असल्यास गाव नमुना नंबर 6‘ड’ मधील कच्चा नकाशा, हा नकाशा उपलब्ध नसल्यास तलाठ्यांकडील प्रमाणपत्र, या नकाशाप्रमाणे प्रत्येक भोगवटदाराच्या कब्जावहिवाटीत असलेले अंदाजित क्षेत्र व अधिकार, अभिलेखात असलेल्या क्षेत्राचा तपशील, सामायिक क्षेत्रात विहीर, कूपनलिका, वस्ती, झाडे याचा तपशील आवश्यक आहेत. 

भोगवटदारांची ओळख पटविण्यासाठी फोटो, ओळखपत्राची स्वाक्षांकित छायाप्रत, आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र, वाहन परवाना, पासपोर्ट व सरकारने दिलेले कोणतेही अधिकृत फोटो ओळखपत्र यापैकी एक, असे पुरावे घेऊन भूमिअभिलेख कार्यालशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.