Tue, Aug 11, 2020 21:51होमपेज › Solapur › चादर अन् कापडी पिशव्यांचे पर्व पुन्हा सुरू

चादर अन् कापडी पिशव्यांचे पर्व पुन्हा सुरू

Published On: Jun 25 2018 1:54AM | Last Updated: Jun 24 2018 8:43PMसोलापूर ः दीपक होमकर 

प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणल्यानंतर आता गादीखाली ठेवलेल्या सर्व कॅरीबॅग्ज गृहिणींनी डस्टबीनमध्ये टाकल्या असून नव्या कापडी पिशव्या घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता वीस वर्षांपूर्वी घराघरांत दिसणार्‍या कापडी व चादरीच्या पिशव्यांचे पर्व पुन्हा एकदा सुरु होणार असल्याचे चित्र आहे.

सोलापूर हे चादर आणि टॉवेलसाठी जगप्रसिध्द शहर. त्यामुळे प्लास्टिक पिशव्यांचे पर्व सुरु होण्याआधी सुमारे 1990 च्या दशकापर्यंत सोलापूरच्या घराघरांत चादरीच्या कापडापासून बनविलेल्या पिशव्या दिसायच्या. चादर कारखान्यातून राहिलेल्या चादरीच्या तुकड्यांपासून तयार केलेल्या पिशव्या तीन-चार किलो वजन सहज पेलवू शकत असल्याने घरातील महिन्याभराचा माल (साखर, डाळ, गूळ, साबण) भरायला जाताना दोन-तीन चादरीच्या पिशव्या घेऊन जायचे.

मात्र पाच किलोपेक्षा अधिक माल भरायला जाताना पांढर्‍या रंगाच्या ताडपत्री पिशव्या वापरल्या जायच्या. मात्र डी-मार्ट, बिग बजार यासारख्या मॉल संस्कृतीने दहा-पंधरा किलोचे वजन पेलू शकेल अशा प्लास्टिक पिशव्या दुकानात दोन-तीन रुपायंमध्ये उपलब्ध केल्यामुळे घरातील चादर, कापड अन् ताडपत्री पिशव्यांची जागा या भल्या मोठ्या प्लास्टिक पिशव्यांनी घेतली. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत चादरीच्या पिशव्यांचा वापर इतका कमी झाला की त्यांचे उत्पादनच थांबले आणि त्या पिशव्या जवळपास नामशेष झाल्या. मात्र प्लास्टिकबंदी कायद्यामुळे आता पुन्हा एकाच दिवसात किलो-अर्धा किलोच्या कापडी पिशव्या बाजारात विक्रीसाठी दिसायला लागल्या आहेत. प्लास्टिकबंदीची कडक अंमलबजावणी झालीच तर स्वयंपाकघरातील खुंट्यांना पुन्हा एकदा सोलापुरी चादरीच्या पिशव्या अडकविलेल्या दिसायला लागतील.

एक ते सतरा रुपयांच्या पिशव्या 

सोलापुरातील डी-मार्ट, बिग बजार या मोठ्या मॉल्सनी गेल्या दोन महिन्यांपासून तीन रुपयांपासून सतरा रुपयांपर्यंच्या कापडी पिशव्या ग्राहकांना विकायला सुरुवात केली होती. मात्र आता छोट्या-मोठ्या किराणा दुकानदारांनीही अर्धा किलो वजन पेलेल इतक्या पिशव्या 1 रुपयांना, तीन किलो वजन पेलेले इतक्या मोठ्या पिशव्या पाच रुपयांना विकायला सुरुवात केली आहे. ग्राहकांनी त्यालाही प्रतिसाद दिला आहे.

कागदी पुड्याही वाढल्या

पूर्वी छटाक ते अर्धा किलोपर्यंतचा माल (जिरेे, मोहरी, चहापत्ती, साखर) कागदी पुड्यात बांधून कापडी पिशव्यांमध्ये ठेवला जायचा. त्याची जागाही प्लास्टिक पॅकिंगने घेतली होती. मात्र काल अनेक दुकानदारांनी पुन्हा एकदा  प्लास्टिक पिशव्यांमध्ये पॅक करण्याऐवजी कागदी पुड्यात माल बांधायला सुरुवात केली आहे. पुडी निसटू नये यासाठी कागदाच्या व्यवस्थित घड्या करून आकर्षक स्वरूपात त्याचा कागदी बॉक्सही अनेकांनी तयार केला. युट्यूबवर कागदी बॉक्स कसा करायचा याचा व्हिडीओ बघून अनेकांनी असे बॉक्स तयार केले.