Tue, Jul 07, 2020 17:53होमपेज › Solapur › पूरग्रस्तांसाठी ‘माढेश्‍वरी’ भगिनींकडून १० हजार भाकरी

पूरग्रस्तांसाठी ‘माढेश्‍वरी’ भगिनींकडून १० हजार भाकरी

Published On: Aug 23 2018 7:09PM | Last Updated: Aug 23 2018 7:09PMसोलापूर : दीपक होमकर 

केरळमधील लाखो बांधवांची घरे पुरामध्ये उद्ध्वस्त झाली, अनेक छावण्यांमध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली असताना त्यांच्या भुकेल्या पोटाची आग शमविण्यासाठी सोलापूरच्या माढेश्‍वरी महिला बचत गट आणि राष्ट्रवादीच्या भगिनींनी त्यांना सोलापूरची भाकरी आणि चटणी देण्यासाठी अहोरात्र चूल पेटवली आहे.

सोलापूरातील माढेश्‍वरी बचत गट आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस व महिला आघाडीच्या वतीने केरळातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तब्बल दहा हजार भाकरी व चटणी पाठविण्यात येणार आहे. त्यासाठी सध्या सुमारे पन्नास महिला दररोज सकाळी नऊ वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत भाकर्‍या आणि चटणी बनविण्यासाठी राबत आहेत. साधारणतः एक किलो ज्वारीच्या पिठामध्ये ३० भाकरी होतात. त्यानुसार दहा हजार भाकरीसाठी सुमारे 300 किलोहून अधिक भाकरीच्या पीठाची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय चार ते पाच सिलेंंडर टाक्यांची व्यवस्था करण्यात आली असून त्या भाकर्‍यांच्या पॅकिंगची स्वतंत्र व्यवस्थेसाठी दोन महिला दिवसभर राबत आहेत.

महिनाभर टिकतील अशा भाकरी

सोलापूरातील कडक भाकरीचे मोठे वैशिष्ट म्हणजे ती कोणत्याही वातावरणात साधारणतः महिनाभर टिकते. त्यामुळे भाकरी कडक होण्यासाठी भाकरी तयार झाल्यावर ती दोन दिवस मोकळ्या वातावरणात वाळविण्यात येत आहेत. त्याचे मान्यताकृत प्लास्टिकच्या पिशवीत त्या पाच-पाच भाकर्‍या पॅक करण्यात येत असल्याने पूरग्रस्तांच्या छावण्यांमध्ये त्यांचे वाटप करणे सोयीचे होणार आहे.

राखीपौर्णिमेला भाऊ बहिणींना भेट देतो, तशी ही बहिणींकडून भावाच्या रक्षणासाठी मदत ठरणार आहे. यासाठी येणारा सर्व खर्च तर आम्ही करत आहोत, त्याचबरोबर लोकांनीही यात सहभागी व्हावे, यासाठी मदत केंद्र सुरू करण्यात येणार असून सोलापूरकरांनी पैसे, कडक भाकर्‍या, कपडे, चादरच्या रुपाने या मदतकार्यात सहभागी व्हावे.

- दिलीप कोल्हे, माजी उपमहापौर