Mon, Jan 25, 2021 00:27होमपेज › Solapur › बोरामणी विमानतळाच्या विकासासाठी सुशीलकुमार शिंदेंचे प्रयत्न सुरू

बोरामणी विमानतळाच्या विकासासाठी सुशीलकुमार शिंदेंचे प्रयत्न सुरू

Published On: May 26 2018 12:20AM | Last Updated: May 26 2018 12:19AMसोलापूर : प्रतिनिधी

होटगी रस्त्यावरील विमानतळावरून विमानसेवेला सिध्देश्‍वर साखर कारखान्याच्या   चिमणीमुळे   अडथळा होत असल्याने  सोलापूरची विमानसेवा रखडली आहे. त्यावर माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बोरामणी विमानतळाचा विकास करून विमानसेवा सुरू करण्याबाबत  विमान वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे मागणी केली. त्यावर सुरेश प्रभू यांनी सकारात्मक असल्याचे शिंदेंना सांगितले.  महाराष्ट्र  आणि देशाच्या नकाशावर महत्त्वाचे शहर म्हणून सोलापूरची ओळख आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांच्या सीमेवर असलेल्या सोलापूरच्या विकासाला गती मिळावी यासाठी विमानसेवेची आवश्यकता आहे. म्हणूनच सोलापुरातील होटगी रस्त्यावर जुने विमानतळ आहे. तेथून काही काळ विमानसेवा सुरू होती.

त्यानंतर तांत्रिक कारणामुळे विमान कंपनीने सोलापूर-मुंबई विमानसेवा बंद केली. त्यानंतर पुन्हा विमानसेवा सुरू व्हावी यासाठी अनेक स्तरांतून मागणी झाली. परंतु सिध्देश्‍वर साखर कारखान्याकडून एक चिमणी  उभारण्यात आली. त्या चिमणीचा   अडथळा  विमान उड्डाण आणि उतरण्यासाठी होतो म्हणून सोलापूरची विमानसेवा रखडली. दरम्यानच्या काळात माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे हे केंद्रीय मंत्री असताना हैदराबाद रस्त्यावर बोरामणी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ मंजूर केले आणि त्याला लागणारी जमीनही शासनाने खरेदी केली. कोट्यवधी रुपये जमीन मालकांना मोबदला देऊन महाराष्ट्र शासनाने बोरामणी विमानतळासाठी जमीन ताब्यात घेतली. त्यावर महाराष्ट्र राज्याच्या विमानतळ विकास कंपनीचे 51 टक्के आणि एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाचे 49 टक्के असा हिस्सा असल्याचा यांच्यामध्ये करार झाला. त्यानंतर केंद्रात आणि राज्यात सरकार बदलले आणि बोरामणी विमानतळ रखडले.

गेल्या चार वर्षांत बोरामणी विमानतळाबाबत सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी काहीच प्रयत्न केले नाहीत आणि केवळ विमानसेवा सुरू करू, असे आश्‍वासन मात्र दिले. परंतु माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बोरामणी विमानतळाचा विषय लावून धरला आणि त्यांनी थेट केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांना पत्र लिहून विचारणा केली. त्यावर सुरेश प्रभू यांनी 21 मे 2018 रोजी सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्राला उत्तर देत सांगितले की, महाराष्ट्र  शासनाकडून दिरंगाई होत आहे. 23 जून 2015 रोजी एक बैठक घेण्यात आली. त्यामध्ये सोलापूरच्या बोरामणी विमानतळासाठी विशेष हेतू वाहन या प्रकल्पाअंतर्गत विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी बंगळुरु आणि हैदराबाद येथील विमानतळाप्रमाणे नव्याने करार करण्याच्या सूचना त्यावेळी देण्यात आल्या होत्या. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी आणि एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया यांच्यामध्ये नव्याने करार करणे अपेक्षित आहे, असेही त्यावेळी सुरेश प्रभू यांनी सांगितले होते.

मात्र महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून अद्याप कसलीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळेच बोरामणी विमानतळाचा प्रश्‍न रखडला आहे, असे सुरेश प्रभू यांच्याकडून आलेल्या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे. सोलापूरचे पालकमंत्री आणि सहकारमंत्री यांनी मनावर घेऊन बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ विकास करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होते; मात्र त्यांच्याकडून होत नाही. सरकार त्यांचे आहे, पण विकासकामे होत नाहीत म्हणूनच सुशीलकुमार शिंदे यांनी याबाबत केंद्रीय विमान वाहतूकमंत्री सुरेश प्रभू तसेच महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.