Mon, Aug 03, 2020 15:04होमपेज › Solapur › मोहोळमध्ये ट्रान्‍सफार्मरमधील १५ हजारचे ऑईल चोरीला

मोहोळमध्ये ट्रान्‍सफार्मरमधील १५ हजारचे ऑईल चोरीला

Published On: Aug 22 2018 7:42PM | Last Updated: Aug 22 2018 7:42PMमोहोळ: वार्ताहर

विजेचा ट्रान्सफार्मर अज्ञात व्यक्तीने फोडून त्यातील १५ हजार रुपये किंमतीचे कॉपर आणि ऑईल चोरल्याची घटना घडली. ही घटना २१ ऑगस्ट रोजी मोहोळ तालुक्यातील पेनूर (तांबडाग वस्ती) गावच्या शिवारात घडली. त्यामुळे परिसरातील विजेची समस्या निर्माण झाली आहे. 

पेनूर (ता. मोहोळ) येथील तांबडाग वस्ती परिसरात महावितरणचा २५ केव्हीचा ट्रान्सफार्मर (रोहित्र) आहे. हा ट्रान्सफार्मर सर्जेराव पवार  या शेतकऱ्यांच्या  शेतात आहे. या ट्रान्सफार्मरवरुन परिसरातील शेतकऱ्यांच्या शेती पंपाला वीज पुरवठा केला जातो. २१ ऑगस्ट रोजी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने विजेच्या खांबावरुन सदरचा डीपी खाली पाडला. त्यानंतर तोडफोड करुन त्यामधील अंदाजे पंधरा हजार रुपये किंमतीचे ऑईल आणि कॉपर कॉइलची चोरी करुन नुकसान केले आहे. ही घटना २२ ऑगस्ट रोजी दुपारी समोर आल्यानंतर महावितरणचे सहायक अभियंता विवेक आकेन आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या घटनेमुळे पेनुरसह तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
महावितरण क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या अज्ञात व्यक्तीच हे कृत्य करु शकते असा नागरिकांचा संशय आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.