होमपेज › Solapur › ‘महाजनादेश’ यात्रेची सांगता सभा पार्क स्टेडियमवर 

‘महाजनादेश’ यात्रेची सांगता सभा पार्क स्टेडियमवर 

Published On: Aug 23 2019 1:35AM | Last Updated: Aug 22 2019 10:33PM

संग्रहित छायाचित्रसोलापूर : प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरू असलेल्या ‘महाजनादेश’ यात्रेची सांगता सभा 1 सप्टेंबर रोजी सोलापुरातील पार्क स्टेडियमवर होणार आहे. यानिमित्ताने नियोजन करण्यासाठी भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख व अन्य पदाधिकार्‍यांनी आज (गुरूवारी) दुपारी 4 वाजता सभा ठिकाणाची पाहणी केली.

सांगली, कोल्हापुरातील महापुरामुळे अर्ध्यावर सोडावी लागलेल्या मुख्यमंत्र्यांच्या ‘महाजनादेश’ यात्रेचा दुसरा टप्पा गुरूवारपासून खान्देशातून सुरू झाला आहे. आपल्या ‘महाजनादेश’ यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांकडून रोड शो, जाहीर सभा, मुक्कामाच्या ठिकाणी गुप्त खलबते केली जात आहेत. सोलापुरातही त्यांची सभा 1 सप्टेंबर रोजी पार्क स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेमुळे होणारी गर्दी, वाहनतळाची व्यवस्था, मुख्यमंत्र्यांना संबोधित करता येण्यासाठी उभारण्यात येणार्‍या व्यासपीठाची पाहणी यावेळी भाजपच्या पदाधिकार्‍यांनी केली. यावेळी देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांच्या वाहनांच्या ताफ्याचा प्रवेश कोठून करावयाचा, सभेसाठी येणार्‍या लोकांना कोठून प्रवेश द्यायचा, वाहतुकीची कोंडी कशी टाळता येईल याचीही पाहणी केली. यावेळी त्यांनी मनपाचे क्रीडाधिकारी नजीर शेख यांना मैदानावर बोलावून मैदानाबाबतची माहिती घेतली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवेळी ज्या पध्दतीने मैदानाच्या मागील बाजूने किंवा पार्क चौपाटीकडून मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा मैदानात आणण्याबाबत यावेळी चर्चा झाली. चौपाटीवरून वाहनांचा प्रवेश निश्‍चित झाल्यास तेथील भेळ विक्रेत्यांना त्यांची दुकाने एक दिवस बंद ठेवण्याबाबत संबंधितांना पत्र देता येईल, अशी माहिती शेख यांनी देशमुख यांना यावेळी दिली. याशिवाय सध्या पावसाचे दिवस असल्याने व्यासपीठासह लोकांसाठीही संपूर्ण मंडप वॉटरप्रूफ उभारण्याबाबत चर्चा करण्यात आली. या पाहणीवेळी भाजपचे सरचिटणीस शशिकांत थोरात, बिज्जू प्रधाने आदी उपस्थित होते.  

मुख्यमंत्र्यांच्या ‘महाजनादेश’ यात्रेची सांगता सभा सोलापुरात 1 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यांच्यासमवेत दोनशे ते तीनशे वाहनांचा ताफा असणार आहे. या वाहनांसह सभेसाठी येणार्‍या लोकांच्या वाहनांसाठी वाहनतळाची व्यवस्था नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर व मनपाaच्या मागील बाजूच्या रस्त्यावर करण्याचा विचार आहे. पावसाळ्याचे दिवस पाहता मंडप व व्यासपीठही वॉटरप्रूफ उभारण्यात येणार आहे.      

 विक्रम देशमुख
 शहराध्यक्ष, भाजप सोलापूर.