Mon, Aug 03, 2020 14:14होमपेज › Solapur › ‘महाविकास आघाडी’ला तीन तर समविचारीला १ जि.प. सभापतिपद

‘महाविकास आघाडी’ला तीन तर समविचारीला १ जि.प. सभापतिपद

Last Updated: Jan 15 2020 1:47AM
सोलापूर : प्रतिनिधी

जिल्हा परिषद विषय समित्यांच्या सभापतिपदांसाठी मंगळवारी दुपारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात निवडणूक घेण्यात आली. यावेळी तीन सभापतिपदे मिळविण्यात ‘महाविकास आघाडी’ला, तर एक सभापतिपद मिळविण्यात भाजप पुरस्कृत समविचारी पक्षाला यश आले. 

शैला गोडसे व मल्लिकार्जुन पाटील या दोन सदस्यांमुळे रणजितसिंह शिंदे यांना पराभव पत्करावा लागल्याची चर्चा निवडीनंतर जिल्हा परिषदेत होती.समाजकल्याण समितीच्या सभापतिपदासाठी ‘महाविकास आघाडी’कडून संगीता धांडोरे यांनी, तर भाजप व समविचारीकडून सुभाष माने यांचा अर्ज दाखल केला होता. या पदाच्या    निवडीसाठी घेण्यात आलेल्या मतदानात दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी 33 मते मिळाली. दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाल्याने चिठ्ठी टाकून सभापती निवड करण्यात आली. यात संगीता धांडोरे यांचे नशीब एका मुलीने चिठ्ठी उचलून उघडले. त्यामुळे खूश होत त्या मुलीला संगीता धांडोरे यांनी मिठी मारून पाचशे रुपयांचे बक्षीस सभागृहात दिले. 

महिला व बालकल्याण समितीच्या सभापततिपदासाठी ‘महाविकास आघाडी’ कडून स्वाती शटगार तर भाजप पुरस्कृत समविचारीकडून संगीता मोठे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या पदासाठी घेण्यात आलेल्या मतदानात  मोेठे यांना 31, तर शटगार यांना 35 मते मिळाली. त्यामुळे एक समिती मिळविण्यात ‘महाविकास आघाडी’तील  काँग्रेसला यश आले.

जि.प.च्या दोन सर्वसाधारण सभापतिपदाच्या निवडीसाठी ‘महाविकास आघाडी’ कडून रणजितसिंह शिंदे व अनिल मोठे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यात रणजितसिंह शिंदे यांना 32, तर विजयराज डोंगरे यांना 34 मते मिळाली. त्यामुळे या निवडीत भाजपला एक सभापतिपद मिळविण्यात यश आले. यासाठी  सदस्य मल्लिकार्जुन पाटील, शैला गोडसे यांचा महत्त्वपूर्ण कौल निर्णायक ठरला गेला. या दोन सदस्यांमुळेच शिंदे यांचा पराभव झाल्याची चर्चा जिल्हा परिषदेत निवडीनंतर होती. 

‘महाविकास आघाडी’ चे अनिल मोठे यांना 34, तर समविचारीचे अतुल पवार यांना 32 मते मिळाली. त्यामुळे सांगोला तालुक्यातील माजी आ. दीपक साळुंके यांच्या गटाला एक सभापतिपद मिळाले.