Tue, Sep 22, 2020 10:55होमपेज › Solapur › शरद पवार यांच्या माळशिरस दौर्‍याने भाजपमध्ये अस्वस्थता

शरद पवार यांच्या माळशिरस दौर्‍याने भाजपमध्ये अस्वस्थता

Last Updated: Jul 20 2020 7:36AM
सोलापूर : पुढारी वृत्तसेवा 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी रविवारी माळशिरस तालुक्याचा दौरा केला. या दौर्‍यात त्यांनी माजी मंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या राजकीय विरोधकांच्या भेटी घेतल्याने माळशिरस  तालुक्यातील भाजपसाठी ही बाब अस्वस्थतेची ठरली आहे. त्यामुळे माळशिरस तालुक्यात पुन्हा एकदा विस्कटलेली राष्ट्रवादीची तालीम मजबूत करण्यास बळ मिळाल्याचे स्पष्ट होत आहे. 

लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या वेळी माळशिरस तालुक्यातील मोहिते-पाटील गटाने भाजपला बळ दिले. त्यामुळे या तालुक्यात राष्ट्रवादीची या निवडणुकीत पीछेहाट झाल्याचे दिसून आले होते. खा. शरद पवार यांचेच कट्टर समर्थक असणार्‍या मोहिते-पाटील गटाने ऐनवेळी या निवडणुकीत राजकीय दिशा बदलली. विधानसभा निवडणुकीनंतर जरी भाजपला यश आले तरी सत्ता स्थापन करण्यात यश आले नाही. राजकीय चमत्कारात राष्ट्रवादी सत्तेत पुन्हा आली. त्यामुळे मोहिते-पाटील गटात पुन्हा नाराजी पसरली गेली. 

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत माळशिरस तालुक्यात विस्कटलेली राष्ट्रवादीची जुनी टिम पुन्हा मजबूत करण्याचा प्रयत्न दस्तरखुद खा. पवार यांनी शुक्रवारी केला. त्यामुळे या तालुक्यातील भाजपला खिंडार पडण्याची शक्यता असून राष्ट्रवादीची तालीम अधिक मजबूत होण्याचा अंदाज व्यक्‍त होत आहे. 

पवार कुटुंबाशी एकनिष्ठ असणारे सामान्य कार्यकर्ता म्हणजे रमेश पाटील. त्यांच्या वडिलांचे निधन झाले म्हणून त्यांचे सांत्वन करण्यासाठी शरद पवार त्यांच्या वाड्यावर गेले. त्यांच्यासोबत पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे आदी मान्यवर उपस्थित होते. 

कण्हेर येथील भेटीनंतर सदाशिवनगर येथे सहकार महर्षी मोहिते-पाटील यांचे ज्येष्ठ सहकारी कै. ज्ञानेश्‍वर सालगुडे-पाटील यांच्या बंगल्यालाही पवार यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांचे चिरंजीव भानुदास सालगुडे-पाटील यांनी त्यांचे स्वागत केले व सदाशिवनगर येथील शंकर सहकारी साखर कारखाना चार वर्षे झाले बंद आहे, तो सुरु करावा, अशी विनंती केली. 

माळशिरस येथे डॉ. रामदास देशमुख व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शंकर देशमुख या बंधूंच्या शिवतीर्थ बंगल्यात कार्यकर्त्यांसोबतही पवार यांनी बैठक घेतली. चहापानानंतर कौटुंबिक चर्चा होऊन सदाशिवनगरच्या कारखान्याबाबत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबत स्थानिक कार्यकर्त्यांची बैठक लावू व शंकर साखर कारखाना कसा चालू होईल, यासाठी राजकारण बाजूला ठेऊन प्रयत्न करण्याचा शब्द पवार यांनी दिला. 

यावेळी माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने-पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, संकल्प डोळस, माजी सभापती मच्छिंद्र ठवरे, तालुका अध्यक्ष माणिक वाघमोडे, भानुदास सालगुडे-पाटील, विलास आद्रट, प्रभाकर इंगळे, हंसराज माने-पाटील, सुजयसिंह माने-पाटील, श्रीराम शिक्षण संस्थेचे करण पाटील, अभिषेक पाटील, आप्पासाहेब वाघमोडे, साहेबराव देशमुख, शुभांगी देशमुख आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली होती. त्यामुळे माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादीला भविष्याकरीता ग्रीन सिग्‍नल मिळण्याचा अंदाज राजकीय क्षेत्रातून व्यक्‍त होत आहे.

 "