Tue, Sep 22, 2020 01:22होमपेज › Solapur › ११ तहसीलदारांना ‘कारणे दाखवा’ नोटीस

११ तहसीलदारांना ‘कारणे दाखवा’ नोटीस

Last Updated: Jan 15 2020 1:47AM
सोलापूर : प्रतिनिधी 

जिल्ह्यातील 11 तहसीलदारांनी दुष्काळ निधी आणि अतिवृष्टीचे पैसे शेतकर्‍यांच्या खात्यांवर वेळेत न जमा केल्याने जिल्हाधिकार्‍यांनी त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावल्या आहेत. त्या त्या प्रांताधिकार्‍यांनी याची सविस्तर चौकशी करुन अहवाल देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे लाखो शेतकर्‍यांचे नुकसान झाले होते. गतवर्षी जिल्ह्यात दुष्काळ पडल्याने शासनाने अशा शेतकर्‍यांसाठी दुष्काळ निधी मंजूर केला होता. त्यासाठीचा निधी त्या त्या तहसीलदारांना वर्ग करण्यात आला होता. मात्र, तहसील कार्यालयातून हा निधी शेतकर्‍यांच्या खात्यांवर वेळेत जमा न झाल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. 

त्यामुळे आलेल्या तक्रारींची दखल घेऊन जिल्हाधिकार्‍यांनी त्या त्या प्रांताधिकार्‍यांना संबंधितप्रकरणी चौकशी करून योग्य तो अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. याकामी निष्काळजीपणा केल्याने तसेच वेळेत पैसे शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा न केल्याने जिल्ह्यातील दक्षिण, उत्तर, अक्कलकोट, करमाळा, माढा, माळशिरस, मोहोळ, पंढरपूर, सांगोला या तालुका तहसीलदारांना याप्रकरणी ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तात्काळ हा निधी शेतकर्‍यांच्या खात्यांवर जमा करण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या आहेत. 

या अवेळी पावसामुळे नुकसान झालेल्या निधी वाटपात दक्षिण सोलापूर, पंढरपूर आणि माळशिरस तालुक्यांत शंभर टक्के निधीचे वाटप झाल्याचा अहवाल दिला आहे, तर सर्वात कमी 78 टक्के वाटप बार्शी तालुक्यात झाले आहे. त्यामुळे हा निधी तात्काळ वाटप व्हावा यासाठी संबंधित तहसीलची चौकशी करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

 "