Mon, Sep 21, 2020 18:48होमपेज › Solapur › ‘मनपा’च्या दमाणीनगरमधील ३ एकर जागेला सुरक्षा भिंत

‘मनपा’च्या दमाणीनगरमधील ३ एकर जागेला सुरक्षा भिंत

Last Updated: Feb 15 2020 12:56AM
सोलापूर : पुढारी वृत्तसेवा

दमाणीनगर लक्ष्मी पेठ परिसरातील महापालिकेच्या जागेची परस्पर विक्री होत असल्याच्या तक्रारीनंतर हा प्रकार चर्चेत आला असून पालिका आयुक्‍त दीपक तावरे यांनी या भागातील एकूण 5 एकरांपैकी ‘मनपा’च्या मालकीच्या तीन एकर जागेवर सुरक्षा भिंत बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेच्या मालकीच्या शहरात मोठ्या प्रमाणावर जागा आहेत. तत्कालीन महापालिका आयुक्‍त डॉ. अविनाश ढाकणे यांनी महापालिकेच्या जागा शोधून त्या जागांच्या प्रॉपर्टी कार्डवर ‘मनपा’चे नाव लावून घेण्याचे मोठे काम केले होते. जवळपास 50 जागांचा शोध लावून त्या जागा पालिकेच्या ताब्यात घेतल्या होत्या. महापालिकेच्या भूमी व मालमत्ता विभागाकडून या महापालिका जागा व मालमत्ता यांची सुरक्षा ठेवण्याची जबादारी आहे. देगाव रोडवरील दमाणीनगर लक्ष्मी पेठ परिसरातील महापालिकेच्या जागेची परस्पर विक्री होत असल्याच्या तक्रारी तेथील नागरिकांकडून आल्यानंतर पालिकेच्या भूमी व मालमत्ता विभागाला जाग आली आहे.

महापालिका आयुक्‍त तावरे यांनी गुुरुवारी सायंकाळी उशिरा पालिका अधिकार्‍यांची बैठक घेत संबंधित पाच एकर जागेपैकी महापालिकेच्या तीन एकर जागेला सुरक्षा भिंत बांधून तिथे महापालिकेच्या मालकीचा फलक लावण्याची सूचना केली आहे. पालिकेच्या अधिकार्‍यांनी आयुक्‍तांच्या आदेशानुसार कार्यवाहीदेखील सुरू केली आहे. परस्पर भूखंड विक्री होत असलेल्या जमिनींपैकी महापालिकेच्या मालकीची असलेली तीन एकर जागा सुरक्षित असून या जागेवरील विक्री झालेली नसल्याचेही पालिकेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. या प्रकरणात राजकारण होत असल्याचीही चर्चा सुरू आहे.

महापालिका गाळ्यांचा विषयही गंभीर

शहर हद्दीत महापालिकेच्या मालकीचे मेजर व मिनी मिळून एकूण 1600 गाळे आहेत. या गाळ्यांच्या लिलावासह भाडेवाढीचा प्रश्‍न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. नवी पेठ आदी मुख्य बाजारपेठांत असलेल्या ‘मनपा’ गाळ्यांचे सध्याचे भाडे अत्यल्प असून महापालिकेचे मोठे नुकसान होत आहे. पालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसताही ‘मनपा’ गाळ्यांबाबत पदाधिकार्‍यांचे मौन घातक आहे. सोलापूर शहराचा विकास करायचा असेल तर ‘मनपा’च्या उत्पन्‍नात भर पडणे गरजेचे आहे.

 "