Mon, Nov 30, 2020 13:24होमपेज › Solapur › सोलापूर : आजपासून शाळा सुरू

सोलापूर : आजपासून शाळा सुरू

Last Updated: Nov 22 2020 11:00PM
सोलापूर : पुढारी वृत्तसेवा 

राज्य शासनाच्या आदेशानुसार सोमवार, 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या वर्गासाठी शाळेची घंटा वाजविण्यात येत आहे. कोरोना परिस्थितीमुळे दक्षता बाळगत एका बेंचवर एक, तर एका वर्गात फक्त वीस विद्यार्थीच बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्व शिक्षक व पालकांचा आत्मविश्वास वाढवून त्यांना शुभेच्छा दिल्या असल्याची माहिती माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांनी दिली. 

कोरोनाशी संघर्ष करीत ‘ज्ञानदीप लावू अंतरी’ या उपक्रमांतर्गत शाळांना सुरुवात करण्यात येत आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी 6 हजार 850 शिक्षक व 4 हजार 348 शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली आहे. यात 178 जणांना कोरोनाचा संसर्ग असल्याचे दिसून आल्याने त्यांना विश्रांती व उपचार देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 

सोलापूर जिल्ह्याभरात नववी ते बारावीपर्यंतच्या एकूण 1 हजार 87 शाळा आहेत. या शाळांत 2 लाख 52 हजार 434 विद्यार्थी शिक्षण घेणार आहेत. गणित, विज्ञान व इंग्रजी या तीन विषयांचे अध्यापन शाळेत, तर उर्वरित विषयांचे अध्यापन हे ऑनलाईन प्रणालीने करण्यात येणार आहे. 

सर्व शाळांची सॅनिटायझरने फवारणी करण्यात आली आहे. शाळेतील पिण्याच्या पाण्याची टाकी व स्वच्छतागृहांची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. शाळेत येणार्‍या शिक्षक, विद्यार्थी यांच्यासह सर्वांना मास्क सक्तीचा करण्यात आला आहे. सर्व शाळेत ऑक्सीमीटर, सॅॅनिटायझर, थर्मलगनचीही सुविधा निर्माण केली असल्याची माहिती शिक्षणाधिकारी बाबर यांनी दिली. जिल्ह्याभरातील 85 टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांची आरोग्य तपासणी झाली असून शाळा सुरु करण्याबाबत तयारी पूर्ण झाली आहे. जिल्हाधिकारी व सीईओ यांनी शिक्षकांचे मनोबल वाढवून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला आहे. त्यामुळे शाळा सुरळीत सुरु होतील, असा विश्वास व्यक्त होत आहे. 

82 टक्के पालकांकडून मिळाली संमती 

कोरोना परिस्थितीशी संघर्ष करून योग्य ती दक्षता बाळगून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा आज (सोमवार) पासून सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शाळेत येणार्‍या मुलांच्या पालकांचे संमतीपत्र घेण्यात यावे, असेही शासनाने आदेश दिले होते. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील आतापर्यंत 82 टक्के पालकांनी आपल्या पाल्यास शाळेत पाठविण्यास लेखी संमती दिली असल्याची माहिती जि.प. माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांनी दिली.