Sun, Aug 09, 2020 11:31होमपेज › Solapur › रस्ते अपघात : मदत करणार्‍यांना त्रास देणाऱ्यांवर कारवाई

रस्ते अपघात : मदत करणार्‍यांना त्रास देणाऱ्यांवर कारवाई

Published On: Apr 27 2018 11:01PM | Last Updated: Apr 27 2018 10:22PMसोलापूर ः प्रतिनिधी

रस्ते अपघातामध्ये जखमी लोकांना तात्काळ मदत मिळावी तसेच अनेकांच्या जीविताचे संरक्षण व्हावे यासाठी अपघातामध्ये मदत करणार्‍या तसेच जखमींना दवाखान्यापर्यंत पोहोचविणार्‍यांना यापुढे चौकशीसाठी त्रास दिल्यास अधिकार्‍यांवरच कारवाई करण्याचे धोरण ठरविण्यात आले असून त्यासाठी शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

अपघातामध्ये जखमी लोकांना तत्काळ मदत मिळणे अपेक्षित असते. मात्र अनेक वेळा मदत करण्याची इच्छा असतानाही काही लोक असे प्रसंग टाळून निघून जातात. त्यामुळे गंभीर जखमी असणार्‍यांना आपले प्राण गमावण्याची वेळ आलेली आहे. अशा घटनांमध्ये साक्षीदार करुन पोलिसांकडून चौकशीच्या नावाखाली त्रास देण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे सहजासहजी कोणी कोणाच्या मदतीला धावून जाण्यासाठी धजावत नाही. त्यामुळे शासनाने त्यासाठी नव्या सूचना जारी केल्या आहेत. त्यासाठी सडक व राज्यमार्ग मंत्रालयाच्यावतीने राजपत्र काढण्यात आले आहे. यामध्ये अपघातात जखमींना दवाखान्यात दाखल करणार्‍यांना कोणत्याही प्रकारचे प्रश्‍न न विचारता त्यांचा माहितीस्तव पत्ता घेऊन त्यांना त्याठिकाणाहून तात्काळ जाण्याची मुभा देण्यात आली आहे. एखाद्या घटनेची माहिती फोनवर कळविलेल्या व्यक्तींना प्रत्यक्ष येऊन माहिती देण्याची अथवा चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे बंधन यापुढे असणार नाही. एखाद्या व्यक्तीने अपघातग्रस्तांना मदत केली असेल तर त्यांना व्यक्तिगत माहिती देण्याची आवश्यकता यापुढे असणार नाही. जर प्रकरण न्यायालयापर्यंत गेले तर अशा व्यक्तींना केवळ एकदाच न्यायालयात बोलावून त्यांची पूर्ण चौकशी करुन पुन्हा त्यांना बोलावण्याची गरज यापुढे राहणार नाही. 

अशा घटनांमध्ये जर काही पोलिस कर्मचारी अथवा अधिकारी मदतदूतांना चौकशीच्या नावाखाली त्रास देत असतील अथवा त्यांच्याकडे पैशाची मागणी करीत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याची तयारीही आता शासनाने ठेवली आहे. त्यामुळे यापुढे अपघातग्रस्तांना मदत करणार्‍या मदतदूतांना या नव्या सूचनांमुळे संरक्षण मिळाले असून त्यांचा आत्मविश्‍वासही वाढणार आहे.