Tue, Jul 07, 2020 18:52होमपेज › Solapur › ‘प्रधानमंत्री किसान मानधन’ योजनेची नोंदणी सुरू

‘प्रधानमंत्री किसान मानधन’ योजनेची नोंदणी सुरू

Published On: Aug 26 2019 1:51AM | Last Updated: Aug 25 2019 9:01PM

संग्रहित छायाचित्रसोलापूर : प्रतिनिधी

‘प्रधानमंत्री किसान मानधन’ योजनेंतर्गत लाभार्थ्यांची नोंदणी 9 ऑगस्टपासून   सुरू  करण्यात आलेली आहे.  ही ऐच्छिक व अंशदायी पेन्शन योजना आहे. या योजनेत शेतकर्‍यांना नोंदणीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी तालुका स्तरावर शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या योजनेत जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे.

‘प्रधानमंत्री किसान मानधन’ योजना भू-अभिलेखानुसार देशातील सर्व पात्र अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. शेतकर्‍यांना वृद्धापकाळात आरोग्यपूर्ण व आनंदी जीवन जगण्यासाठी आर्थिक मदत करणे ‘प्रधानमंत्री किसान मानधन’ योजनेचा प्रमुख उद्देश आहे. योजनेंतर्गत सर्व पात्र अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांना दरमहा तीन हजार रुपये निश्‍चित पेन्शन देण्यात येईल. या योजनेंतर्गत भारतीय जीवन  विमा निगम (एल.आय.सी.) द्वारा प्रबंधित पेन्शन फंडाद्वारे नोंदणीकृत पात्र शेतकर्‍यांना पेन्शन देण्यात येणार आहे. 

या योजनेंतर्गत मार्गदर्शक सूचनेनुसार 18 ते 40 वर्षे या वयोगटातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी नोंदणी करण्यासाठी पात्र आहेत. या योजनेंतर्गत पात्र नोंदणीकृत शेतकर्‍यांना 1 ऑगस्ट 2019 रोजीच्या वयानुसार रक्‍कम 55 ते 200 रुपये  प्रति महिना  मासिक हप्ता वयाची 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत पेन्शन फंडामध्ये जमा करावी लागणार आहे. शेतकर्‍यांना पेन्शन फंडामध्ये जमा केलेल्या मासिक हप्त्याइतकीच मासिक रक्‍कम केंद्र शासन संबंधित शेतकर्‍यांच्या पेन्शन फंडामध्ये जमा करणार आहे.

योजनेत अल्प व अत्यल्प भूधारक  शेतकरी पती/पत्नी स्वतंत्रपणे योजनेमध्ये  भाग घेऊ  शकतात. त्यांच्या  स्वतंत्र नोंदणीनुसार वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना स्वतंत्रपणे 3 हजार रुपये मासिक पेन्शन मिळणार आहे. ज्या पात्र अल्प व अत्यल्प भूधारक  शेतकर्‍यांनी योजनेमध्ये भाग घेतलेला असून काही कारणांमुळे त्यांना योजनेतून बाहेर पडावयाचे असल्यास त्यांची पेन्शन फंडामध्ये जमा केलेली रक्‍कम व्याजासह त्यांना परत करण्यात येईल. या योजनेंतर्गत नोंदणीकृत शेतकर्‍याचे सेवानिवृत्ती तारखेपूर्वी (म्हणजेच वय 60 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी) आकस्मिक निधन झाल्यास त्या व्यक्‍तीचे 60 वर्षे वयापर्यंतचे उर्वरित मासिक हप्ते पती/पत्नी हे पेन्शन फंडामध्ये जमा करून त्या व्यक्‍तीचे पेन्शन खाते चालू ठेऊ शकतात.

सेवानिवृत्ती तारखेपूर्वी निधन झालेल्या पती/पत्नी शेतकर्‍याचे पेन्शन खाते बंद करावयाचे असल्यास त्या पती/पत्नी शेतकर्‍याने पेन्शन फंडामध्ये अंशदायी जमा केलेली रक्‍कम व्याजासह वारसदार पती/पत्नी  शेतकर्‍यास  मिळेल. सेवानिवृत्ती तारखेपूर्वी निधन  झालेल्या शेतकर्‍यास पती/पत्नी नसल्यास त्या शेतकर्‍याने पेन्शन फंडामध्ये अंशदायी जमा केलेली रक्‍कम व्याजासह वारसदारास मिळेल. सेवानिवृत्ती तारखेपूर्वी निधन झालेल्या शेतकर्‍याच्या पती/पत्नीस दरमहा 50 टक्के म्हणजेच  1500 रुपये परिवारिक मासिक पेन्शन मिळेल.

योजनेंतर्गत नोंदणीकृत शेतकरी ‘प्रधानमंत्री किसान मानधन’ योजनेचा लाभार्थी असल्यास त्याच्या संमतीनुसार योजनेच्या लाभातून ‘प्रधानमंत्री किसान मानधन’ योजनेची अंशदायी हप्ता रक्कम कपात करण्यात येईल. योजनेंतर्गत शेतकर्‍यांनी सामायिक सुविधा केंद्रामार्फत पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावयाची असून या नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. केंद्र शासनाकडून लाभार्थी नोंदणी फी रक्कम 30 रूपये (प्रति शेतकरी) सामायिक सुविधा केंद्रास अदा करण्यात येणार आहे. नोंदणीसाठी लाभार्थी शेतकरी यांनी मार्गदर्शक सूचनेनुसार आवश्यक असणारी कागदपत्रे (आधारकार्ड, बँक पासबूक, मोबाईल नंबर इ.) सामायिक सुविधा केंद्रात घेऊन जाणे आवश्यक आहे.

यांना मिळणार नाही लाभ

राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (एन.पी.एस.), कर्मचारी राज्य विमा निगम योजना, कर्मचारी फंड ऑर्गनायझेशन स्किम यासारख्या इतर कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजनांतर्गत लाभ घेणारे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी या योजनेस अपात्र असतील. कामगार आणि रोजगार मंत्रालयाद्वारे प्रशासित ‘प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन’ योजना (पी.एम.एस.वाय.एम.) मध्ये निवडण्यात आलेले शेतकरी या योजनेस अपात्र असतील. कामगार आणि रोजगार मंत्रालयाद्वारे प्रशासित ‘प्रधानमंत्री लघू व्यापारी मानधन’ योजना (पी.एम.एल.व्ही.एम.) मध्ये निवडण्यात आलेले शेतकरी योजनेस अपात्र असतील.