Thu, Aug 13, 2020 16:21होमपेज › Solapur › आषाढी वारीतून रेल्वेला सात लाखांचा तोटा

आषाढी वारीतून रेल्वेला सात लाखांचा तोटा

Published On: Jul 20 2019 5:53PM | Last Updated: Jul 20 2019 6:14PM
सोलापूर : प्रतिनिधी 

नुकत्याच पार पडलेल्या पंढरीच्या आषाढी वारीतून यंदा रेल्वे प्रशासनाला एक कोटी 2 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. 7 ते 16 जुलै दरम्यान 34 विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या. गतवर्षीच्या तुलनेत 7 लाख रुपयांनी उत्पन्न घटल्याची माहिती रेल्वेचे वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे यांनी दिली.

पंढरपूरच्या आषाढी वारीनिमित्त रेल्वे विभागाकडून यंदाही वारकरी प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष सोय केली. राज्याच्या कानाकोपर्‍यातून लाखो वारकरी नित्यनेमाने दरवर्षी पंढरीची वारी करतात. यंदा कोकणासह महाराष्ट्रात पावसाळ्याच्या सुरुवातीला बरा पाऊस झाल्याने वारकरी पेरणी करून वारीला आले होते. 

रेल्वे विभागाकडून यंदा 7 जुलै 16 जुलैदरम्यान आषाढीसाठी पंढरपूरला 34 गाड्यांच्या 135 फेर्‍या झाल्या. पंढरपूर रेल्वेस्थानकातून यंदा 1 लाख 31 हजार 353 प्रवाशांनी प्रवास केला. ही संख्या गतवर्षीच्या तुलनेत घटली आहे. पंढरपूर रेल्वे स्थानकाला यंदा 1 कोटी 2 लाखांचे उत्पन्न मिळाले. पंढरपूर रेल्वे स्थानकावर वारकर्‍यांच्या सेवेसाठी 11 तिकीट खिडक्यांची सोय करण्यात आली. त्यासोबत 20 तिकीट कलेक्टर आणि 25 आरपीएफ पोलिसांची तुकडी तैनात करण्यात आली होती, असे हिरडे यांनी सांगितले.