होमपेज › Solapur › ‘पतंजली’चा मेळावा उधळण्याचा राष्ट्रवादी महिला आघाडीचा प्रयत्न

‘पतंजली’चा मेळावा उधळण्याचा राष्ट्रवादी महिला आघाडीचा प्रयत्न

Published On: Mar 19 2018 1:49AM | Last Updated: Mar 18 2018 10:31PMसोलापूर  : प्रतिनिधी 

अमृतावहिनी, जरा आमचेही ऐका, रामदेवबाबांच्या पतंजलीऐवजी महिला बचत गटांच्या उत्पादनांना सरकारी विक्री केंद्रात स्थान द्या, अशी मागणी करीत सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी आघाडीने रविवारी पतंजली योग समितीचा महिला मेळावा उधळण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.  रविवारी दुपारी चार वाजता पार्क मैदान येथे सुरू असलेल्या महिला मेळाव्यात योगगुरू रामदेवबाबा यांच्यासह अभिनेत्री हेमामालिनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांचा या कार्यक्रमात घुसून हा कार्यक्रम  उधळण्याचा बेत होता. ‘अमृतावहिनी हाय हाय’, ‘भाजपाचा धिक्‍कार असो’, आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची मात्र तारांबळ उडाली. पोलिस आणि महिला कार्यकर्त्या आमनेसामने आल्यामुळे तब्बल अर्धा तास डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील पार्क मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळ गोंधळ निर्माण झाला होता. परिस्थिती आवाक्यात येत नसल्याचे  पाहून  अखेर फौजदार चावडीचे पोलिस निरीक्षक शहाजी पवार यांनी पोलिसांची कुमक मागविली.      राष्ट्रवादी महिला आघाडीच्या निरीक्षक निर्मला बावीकर, मंदाताई  काळे, शहराध्यक्षा नगरसेविका सुनिता रोटे यांच्या नेतृत्वाखाली हे लक्षवेधी आंदोलन  करण्यात आले. शहर व जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या जवळपास 68 महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.   

  आक्रमक झालेल्या महिला पोलिसांचेसुद्धा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. पोलिसांचे कडे तोडण्याचा प्रयत्न त्या करीत असताना अखेर महिला पोलिसांना बोलावून घेण्यात आले आणि प्रचंड गोंधळ होऊन पोलिस आणि कार्यकर्ते यांच्यात ढकलाढकली सुरु झाली. पतंजलीच्या उत्पादनाला मोठी बाजारपेठ मिळवून देणार्‍या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामदेवबाबांच्या पतंजलीऐवजी महिला बचत गटाचे उत्पादने सरकारी विक्री केंद्रात विक्रीस ठेवण्यासाठी स्थान द्यावे आणि सोलापूरच्या महिलांची आर्त हाक अमृता फडणवीस यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचवावी म्हणून आम्हाला अमृता फडणवीस यांना  भेटायचे आहे, असे राष्ट्रवादीच्या महिला पोलिसांना सांगत होत्या. मात्र पोलिसांनी त्यांना परवानगी न दिल्यामुळे गोंधळ उडाला.

महिला पोलिसांनी आपल्या हातातील काठ्यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना हुसकावून लावत पोलिस गाडीत बसविले.  बचत गटाच्या माध्यमातून गोरगरीब व गरजू महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना सरकारी विक्री केंद्रात स्थान देण्याऐवजी भाजप सरकार रामदेवबाबांच्या पतंजलीच्या उत्पादनाचे मार्केटिंग करत असल्याचा आरोप जिल्हा निरीक्षक निर्मला बावीकर यांनी केला.  राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बचत गटाच्या माध्यमातून लाखो महिलांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून दिले. त्यांनी तयार केलेल्या वस्तू सरकारी केंद्रात विक्रीसाठी ठेवण्याला प्राधान्य देण्याऐवजी भाजप सरकार पतंजलीच्या उत्पादनांना प्राधान्य देत असून त्याला विरोध करण्यासाठी अमृता फडणवीस वहिनीसमोर आंदोलन करावे लागले. या आंदोलनाची दखल न घेतल्यास  तीव्र आंदोलन करू, असा इशारा शहराध्यक्षा सुनिता रोटे यांनी दिला.   

 भाजप सरकार आल्यापासून महिलांच्या हाताला काम मिळणे बंद झाले आहे. बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्याऐवजी मोदी व फडणवीस सरकार रामदेवबाबांच्या उत्पादनांना विक्री व्यवस्था उपलब्ध करून देत आहे. यामुळे बचत गट मोडीत काढण्याचा भाजप सरकारचा घाट असल्याचा आरोप जिल्हाध्यक्षा मंदाताई काळे यांनी केला.
यावेळी लता ढेरे, सुनिता गायकवाड, निलाताई खांडेकर, स्नेहलता नवगिरे, करुणा काशीद, मालती माने, शोभा गायकवाड, किरण मोहिते, निलोफर तांबोळी, संगीता कांबळे, मार्था आसादे, राणी कोरे, राजश्री लिंबोळे, संगीता राठोड, रंजना हजारे, सुधामती माळी, अनिता पवार, जयश्री माडगूळकर, राधा मलपे, संगीता पाटील, सकुताई वाघमारे, जयश्री पाटील आदी उपस्थित होते.