Sat, Aug 08, 2020 02:13होमपेज › Solapur › खुल्या जागेत खुलेआम अतिक्रमण

खुल्या जागेत खुलेआम अतिक्रमण

Published On: Dec 28 2017 1:27AM | Last Updated: Dec 27 2017 8:43PM

बुकमार्क करा
पंढरपूर : प्रतिनिधी

शहरातील नगरपालिकेच्या इंदिरा गांधी व्यापारीसंकुलाच्या पिछाडीस असलेल्या खुल्या जागेवर खुलेआम अतिक्रमणे झालेली आहेत. ही अतिक्रमणे कुणाच्या आशीर्वादाने उभी राहिली आहेत असा, प्रश्‍न उपस्थित केला जाऊ लागला आहे. या व्यापारीसंकुलास अतिक्रमणाचा विळखा घातला गेला आहे. त्यामुळे लाखो रुपये अनामत भरून हजारो रुपयांचे भाडे भरणारे दुकान गाळेधारक त्रस्त झालेले आहेत. 
पंढरपूर शहरात अतिशय महत्त्वाचा आणि सतत गजबजलेला परिसर म्हणून नवीन बसस्थानकालगत असलेल्या रेल्वे पुलाशेजारील इंदिरा गांधी चौकात नवीन व्यापारीसंकुल सुमारे 7 वर्षांपूर्वी बांधलेले आहे. त्या व्यापारीसंकुलामध्ये तळमजल्यावरील सर्वच दुकान गाळे विक्री झालेले असून 10 ते 20 लाख रुपये अनामत रक्कम तसेच महिन्याला हजारो रुपये भाडे, पालिकेचा कर भरून व्यापारी ग्राहकांची प्रतीक्षा करीत बसलेले असतात. त्याचवेळी या व्यापारीसंकुलाच्या बाजूला, पिछाडीला खुल्या जागेत अनेक फुकटचंबू बाबुरावांनी अतिक्रमणे थाटलेली आहेत. 

रेल्वेलाईन आणि पंढरपूर नगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या मोकळ्या जागेवर ही अतिक्रमण झालेली आहेत. खोकी टाकून, काहीजणांनी पत्राशेड मारून, काहीजणांनी नुसतेच वासे रोवून अतिक्रमणे थाटलेली आहेत. व्यापारीसंकुलाच्या पुढील बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत सायंकाळच्या वेळी विविध खाद्यपदार्थ विक्रेते दुकाने थाटतात. त्याचबरोबर बेकायदा प्रवासी वाहतूक करणारी खासगी वाहने व्यापारीसंकुलाच्या सभोवताली दिवसभर उभी असतात. त्यामुळे या व्यापारीसंकुलात ग्राहक येण्याचा विचारही करीत नाही. या व्यापारीसंकुलात काही बड्या भाडेकरूंनी मनमानेल तशा पद्धतीने दरवाजे काढले आहेत. भिंती पाडलेल्या आहेत आणि लोखंडी पार्टिशन उभे करून शेकडो चौरस फूट जागेवर फुकटात  ताबा घेतलेला आहे.

अतिक्रमण, अनावश्यक मनमानी बदल आणि जाहिरात फलकांचा भडीमार यामुळे याठिकाणचे व्यापारी, दुकान गाळेधारक त्रस्त झालेले आहेत. लाखो रुपये गुंतवूनही ग्राहकांची वाट पाहात बसावे लागत असतानाच दुसर्‍या बाजूला बेकायदा अतिक्रमण करून टपरी, खोकीधारक दररोज हजारो रुपये कमावत आहेत. दरम्यान, खुलेआम झालेल्या खुल्या जागेतील अतिक्रमणास कुणाचे  संरक्षण आहे याविषयी चर्चा सुरू झालेली आहे. भर चौकात, मोकळ्या जागेत झालेली ही अतिक्रमणे पालिका प्रशासनास दिसत कशी नाहीत, असाही सवाल उपस्थित केला जात आहे. ही अतिक्रमणे हटवून व्यापारीसंकुलात केलेले बेकायदा अतिक्रमण काढले जाणार का, याकडे व्यापारीसंकुलातील गाळेधारकांचे लक्ष लागले आहे. इतके अतिक्रमण होऊनदेखील त्यांना अभय कशामुळे दिले जात आहे, हे समजत नाही.