Thu, Jan 28, 2021 08:14होमपेज › Solapur › आषाढी यात्रेला जिल्हा पोलिसांचा रेड सिग्‍नल 

आषाढी यात्रेला जिल्हा पोलिसांचा रेड सिग्‍नल 

Last Updated: May 20 2020 2:03AM
पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता आषाढी वारी मोठ्या प्रमाणात भरली जाऊ नये, अशीच पोलिस प्रशासनाची भूमिका असून याबाबत काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री यांच्या समवेत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्स बैठकीत मत मांडले असल्याची माहिती जिल्हा पोलिसप्रमुख मनोज पाटील यांनी पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना दिली.

पाटील यांनी शहर पोलिस ठाण्यास भेट दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अतिरिक्‍त जिल्हा अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सागर कवडे, शहर पोलिस निरीक्षक अतुल पवार आदी उपस्थित होते.

आषाढी वारीसंदर्भात अद्याप शासनाने अंतिम निर्णय घेतला नसला तरी याबाबत मते जाणून घेण्यासाठी काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व प्रशासनाशी संवाद साधला होता. यामध्ये पोलीस प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने आषाढी वारी न होणे हिताचे ठरेल असे मत मांडले. कोरोनाचा संसर्ग सध्या वाढत असून वारीस राज्यभरातून लाखो भाविक दाखल झाल्यास आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होवू शकतो. यामुळे पोलीस प्रशासनाने वारी भरली जावू नये अशी भूमिका घेतली आहे. 

दरम्यान, शासनाने नागरिकांना आपल्या गावी जाण्यास परवानगी दिली असून या अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात 43 हजार विविध वाहनाने स्थानिक लोक आले असल्याची माहिती पाटील यांनी दिली. या पैकी आठ हजार वाहने जिल्ह्यातील असून उर्वरीत 35 हजार वाहनाने नागरिकांना येथे सोडण्यात आले आहे. या सर्व नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातून रोज दोन ते अडीच हजार लोक आपल्या गावी जात असून पाचशे ते सहाशे लोक जिल्ह्यात दाखल होत आहेत. त्यांच्या तपासणीसाठी 28 मार्गावर चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. मोठ्या संख्येने लोक आपल्या गावी वापस येत असल्याने येत्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. यासाठी नागरिकांनीच स्वतःची व कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे.

पोलीस कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी पंढरपूरप्रमाणे जिल्ह्यात इतरत्र  देखील  आर्युेवेदिक  काढा देण्यात येत असून च्यवनप्राशचे देखील वाटप करण्यात येणार आहे. तसेच 20 हजार हायड्रोक्सीक्लोरीक्‍विन गोळ्यांचा साठा तयार आहे. जिल्ह्यातील 13 पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी 11 जण कोरोनामुक्‍त झाले असून उर्वरीत दोघांची तब्येत देखील ठणठणीत असल्याचे मनोज पाटील यांनी स्पष्ट केले.

शासनाचे नियम पाळण्याचे आवाहन 

चौथ्या लॉकडाऊनमध्ये मोठी शिथिलता देण्यात आली असून आता पोलिसांची भूमिका देखील बदलली असल्याचे पाटील यांनी सांगितले. आता नागरिकांना खरेदीसाठी बाहेर पडता येणार असले तरी त्यांनी शासनाचे सर्व नियम पाळावेत असे आवाहन त्यांनी केले. कारण कोरोना हा काही दिवसांत संपणारा आजार नाही. यामुळे प्रत्येकाने सुरक्षित अंतर ठेवणे, वारंवार हात पाय धुणे, मास्क घालणे आदी नियम पाळूनच जगावे लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.