Wed, Apr 01, 2020 01:30होमपेज › Solapur › दीड कोटीचा भ्रष्टाचार गुन्हा दाखल होणार

दीड कोटीचा भ्रष्टाचार गुन्हा दाखल होणार

Last Updated: Jan 22 2020 2:18AM
सोलापूर ः प्रतिनिधी

महापालिका झोन क्रमांक 1 अंतर्गत अधिकार्‍यांच्या बोगस सह्या करून दीड कोटींच्या भ्रष्टाचारप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे संकेत प्रशासनाकडून मिळत आहेत. ‘मनपा’ उपायुक्‍त दौर्‍यावरून परतल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्‍त होत आहे. तपासात असे आणखीन प्रकार उघडकीस येतील, अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान, नगरसेवकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चेतन नरोटे, आनंद चंदनशिवे यांनी सभागृहात गौप्यस्फोट केला की, महापालिकेच्या विभागीय कार्यालय 1 अंतर्गतच्या नगरसेवकाने अधिकार्‍यांच्या बोगस सह्या करून दीड कोटींचा भ्रष्टाचार केला आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी सभागृहात विरोधी पक्षाने केली होती. बोगस सह्यांचे प्रकरण असल्याबाबत महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता आणि विभागीय कार्यालय 1 चे अधिकारी यांनी सभागृहातच दुजोरा दिला होता. महापौरांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याची चर्चा होती. दरम्यान, सोमवारी महापालिका प्रशासनाने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे संकेत दिले असून ‘मनपा’ उपायुक्‍त अजयसिंह पवार शासकीय कामानिमित्त दौर्‍यावर असून ते परतल्यानंतर याप्रकरणी कार्यवाही होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास आणखीन काही प्रकार उघडकीस येण्याची शक्यतादेखील वर्तवली जात आहे.