Thu, Jun 24, 2021 10:49
मंगळवेढ्यात महिलेचा डोक्यात दगड घालून खून

Last Updated: Jun 11 2021 2:50AM

मंगळवेढा : पुढारी वृत्तसेवा

मंगळवेढा शहरानजीक अकोला मार्गाजवळ मंगल कुबेर नरळे (वय 35) या महिलेचा घराच्या गच्चीवर डोक्यात दगड घालून अज्ञात व्यक्‍तीने निर्घृण खून केला. ही घटना बुधवारी (दि. 9 जून) रात्री अकराच्या सुमारास घडली. याबाबत मृत महिलेची आई चंदाबाई कुबेर नरळे (वय 55) यांनी मंगळवेढा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा नोंद झाला आहे.

मंगळवेढा शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर अकोला रोडवर चंदाबाई नरळे (वय 55) या मुलगी मंगल हिच्यासमवेत राहत होत्या. उकाडा असल्याने  बुधवारी त्या दोघी घराच्या गच्चीवर झोपल्या होत्या.
रात्री अचानक अचानक चंदाबाई यांच्या पोटात दुखू लागल्याने त्या प्रात:विधीसाठी खाली आल्या. या दरम्यान मंगल गच्चीवर एकट्या झोपल्या होत्या. 

चंदाबाई या पुन्हा झोपण्यासाठी गच्चीवर जात असताना त्यांना कशाचा तरी आवाज आला. त्यामुळे त्या गच्चीवर गेल्या. त्यांनी तेथे जावून पाहिले असता मंगल हिच्या डोक्यात दगड घातल्याने रक्‍ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. यात ती जागीच गतप्राण झाली होती. 

याबाबत चंदाबाई नरळे यांनी पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. तसेच अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान बुरसे करीत आहेत.