Thu, Apr 02, 2020 00:19होमपेज › Solapur › मोहोळ : बारावी परीक्षेला निघालेल्‍या विद्यार्थ्याचा दुचाकी अपघातात मृत्‍यू

मोहोळ : बारावी परीक्षेला निघालेल्‍या विद्यार्थ्याचा दुचाकी अपघातात मृत्‍यू

Last Updated: Feb 21 2020 1:16AM
मोहोळ : प्रतिनिधी

बारावीच्या परीक्षेला निघालेल्‍या विद्यार्थ्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीवरील एक विद्यार्थी जागीच ठार झाला. ही घटना गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मोहोळ येथे घडली. सौरभ दशरथ वाघ (वय १८, रा. वाफळे ता. मोहोळ) असे मृत्‍यू झालेल्‍या विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेची नोंद मोहोळ पोलिस स्‍टेशनमध्ये करण्यात आली आहे.

अधिक वाचा : देवेंद्र फडणवीस यांच्या जामीनाबाबत कोर्टाचा मोठा निर्णय

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सध्या बारावीची परीक्षा सुरू आहे. सौरभ आणि स्वप्निल ज्ञानेश्वर चव्हाण (वय १८, रा. नेमतवाडी ता. मोहोळ) हे दोघे मित्र आहेत. यातील सौरभ हा नागनाथ महाविद्यालयात तर स्वप्निल हा नेताजी प्रशाला येथे इयत्ता बारावीचे शिक्षण घेत होता. गुरुवारी बारावीचा पेपर देण्यासाठी ते दोघे दुचाकी क्रं एम.एच. १३. सी.डब्ल्यू. १०५३ सोलापूर-पुणे महामार्गावरुन मोहोळकडे येत होते. 

अधिक वाचा : शिवेंद्रराजेंची प्रकृती ठणठणीत; उदयनराजेंचे ट्विट

सकाळी साडेनऊ वाजता त्यांची दुचाकी मोहोळजवळ कचरे पेट्रोलपंप पार करून पुढे आली असता, पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. त्यामुळे त्यांची दुचाकी रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या सायकलस्वारावर आदळली. या अपघातामध्ये सौरभ वाघ हा विद्यार्थी गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला, तर स्वप्नील चव्हाण आणि सायकलस्वार दत्तात्रेय दगडू घोरपडे हे किरकोळ जखमी झाले. 

अधिक वाचा : गुरुवार ठरला घातवार; विविध अपघातांत ३८ ठार

या अपघाताची नोंद मोहोळ पोलिस स्‍टेशनमध्ये करण्यात आली असून, अज्ञात वाहन चालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार नागप्‍पा निंबाळे हे करीत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे वाफळेसह संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.