Thu, Jun 24, 2021 11:55
दूध दरवाढीसाठी रास्ता रोको

Last Updated: Jun 11 2021 2:50AM

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा

दूध दरवाढीच्या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीने गुरुवारी (दि. 10) एकलासपूर येथे पंढरपूर-मंगळवेढा मार्ग रोखून आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्यात आला. यावेळी म्हशीच्या दुधाला प्रति लिटर 60 रुपये, तर गायीच्या दुधाला प्रति लिटर 30 रुपये दर मिळालाच पाहिजे, असा पवित्रा घेण्यात आला. 

गुरुवारी राज्यभरात रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली दूध दर कपातीविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी एकलासपूर येथे रास्तारोको करण्यात आला. राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्यास कार्याध्यक्ष दीपक भोसले यांच्यावतीने दुग्धाभिषेक घालण्यात आला. यावेळी दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भोसले म्हणाले,  कोरोनामुळे शेतकरी सध्या अडचणीत आले आहेत. शेतकरी अडचणीत असताना दुधाचे दर कमी केले आहेत. दूध उत्पादक शेतकर्‍यांचे लिटरमागे गायीचे 10 रुपये, तर म्हशीचे 20 रुपये दर पाडले आहेत.  त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.  राज्यातील 2 कोटी दूध उत्पादकांना दररोज 20 कोटींचा फटका बसत आहे म्हणून या सरकारचा निषेध करण्यात आला असून गायीच्या दुधाला प्रति लिटर 30 रुपये, तर म्हशीच्या दुधाला प्रति लिटर 60 रुपये दर मिळावा, अशी संघटेनची मागणी आहे. 

यावेळी बबलू ताड, अनिल गायकवाड, पांडुरंग शिंदे, दाजी ताड, सचिन पाटील, दादा घाटुळे, शंकर गवळी, सावकार शिंदे, महावीर गायकवाड, सुनील शिंदे यांच्यासह दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

आठ दिवसांत दरवाढ न केल्यास तीव्र आंदोलन

दीपक भोसले म्हणाले,  राज्य सरकारने येत्या आठ दिवसांत गायी व म्हशीच्या दुधाच्या दरात वाढ करावी; अन्यथा पुणे, मुंबईला जाणारे दुधाचे टँकर अडविण्यात येतील. जोपर्यंत सरकार दूध दरवाढ करणार नाही तोपर्यंत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी दिला आहे.