Sun, Aug 09, 2020 01:27होमपेज › Solapur › मराठा आरक्षण :  मोहोळ येथे मराठा बांधवांनी केला जल्लोष...

मराठा आरक्षण :  मोहोळ येथे मराठा बांधवांनी केला जल्लोष...

Published On: Jun 27 2019 6:10PM | Last Updated: Jun 27 2019 6:10PM
मोहोळ : वार्ताहर

मराठा आरक्षण न्यायालयाच्या कसोटीवर टिकले आहे. संपूर्ण मराठा समाजाला याचा शैक्षणिक फायदा होणार असल्यामुळे मोहोळ येथे सकल मराठा समाजाने फटाक्यांची अतषबाजी करून, एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला.

गेल्या काही वर्षांपासून मराठा समाज आरक्षणासाठी लढा देत आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी विविध आंदोलनादरम्यान सुमारे ५० मराठा बांधवांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन हा लढा अधिक तीव्र केला होता. गुरुवारी २७ जून रोजी मुंबई उच्च न्यायालयाने देखील मराठा आरक्षण मान्य केल्याने अनेक वर्षाच्या या लढ्याला यश मिळाले आहे. 

सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ राजर्षी शाहू महाराज यांनी आरक्षणाची संकल्पना मांडली. त्याच शाहू महाराजांचा मराठा समाज आज आर्थिक दुर्बलतेमुळे मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी धडपडत होता. आज मराठा समाजाचे आरक्षण उच्च न्यायालयाने देखील मान्य केले. ही मराठा समाजाच्या शैक्षणिक दृष्टीने महत्त्वाची बाब ठरणार असून आरक्षणामुळे मराठा समाजाला प्रगती करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे आम्ही उच्च न्यायालयाचे तसेच राज्य सरकार आणि आरक्षण मंजूर होण्यासाठी सत्ताधाऱ्यांवर दबाव आणणाऱ्या विरोधी पक्षांचे देखील आभार मानतो, अशी भावना यावेळी डॉ. स्मिता पाटील यांनी व्यक्त केली.

यावेळी उपस्थित मराठा बांधवांनी आरक्षणासाठी प्राण दिलेल्या मराठा बांधवांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर एकमेकांना पेढे भरवत व  फटाक्यांची आतषबाजी करून आनंद साजरा केला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक मराठा लाख मराठा या घोषणांनी मोहोळ नगरपरिषद परिसर दणाणून सोडला. यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते.