Tue, Oct 20, 2020 11:40होमपेज › Solapur › मराठा आरक्षण : मोहोळमध्ये आ. यशवंत मानेंना आंदोलकर्त्यांचा घेराव

मराठा आरक्षण : मोहोळमध्ये आ. यशवंत मानेंना आंदोलकर्त्यांचा घेराव

Last Updated: Sep 21 2020 5:41PM

मोहोळ (जि. सोलापूर) येथे सकल मराठा समाजाकडून आ. यशवंत माने यांना घेराव घालून निवेदन देण्यात आले.मोहोळ : पुढारी वृत्तसेवा

सर्वोच्च न्यालयाने मराठा आरक्षणाला  स्थगिती दिल्यामुळे मराठा बांधवांनी पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. सोमवारी (दि. २१) मराठा समाजाने पुकारलेल्या जिल्हा बंद आंदोलनाला मोहोळ शहरवासीयांनी कडकडीत बंद ठेऊन शंभर टक्के प्रतिसाद दिला. यावेळी सकल मराठा समाजाकडून आमदार यशवंत माने यांना घेराव घालून निवेदन देण्यात आले.

मराठा समाजाला मिळालेले आरक्षण केंद्र आणि राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. त्यामुळे दोन्ही सरकाराचा तीव्र निषेध व्यक्त करीत सकल मराठा समाज वतीने २१ सप्टेंबर रोजी मोहोळ शहर बंद करण्यात आले होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सकाळी ११ वाजता मराठा आंदोलकांनी आसूड ओढत मोहोळच्या शासकीय विश्रामगृहात आमदार यशवंत माने यांना घेराव घातला. यावेळी त्यांना मराठा भागीनींनी निवेदन दिले. यावेळी आ. माने यांनी आपण मराठा समाजाच्या बाजूने असल्याचे सांगत, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्याच्या विधीमंडळात आवाज उठविण्याचे अश्वासन दिले.

यावेळी मराठा समाजातील अनेक जाणकार व्यक्तींनी भाषणाद्वारे मराठा समाजाच्या मनातील आरक्षणा विषयीच्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी जमलेल्या आंदोलकांनी आरक्षण आमच्या हक्कांच...!, एक मराठा, लाख मराठा, कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. या आंदोलनात शेकडो मराठा बांधव रस्त्यावर उतरले होते.       

दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने ३५ जणांना सीआरपीसी १४९ प्रमाणे नोटीस दिली. शिवाय सोलापूर ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रभाकर शिंदे, मोहोळचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यासह ५ अधिकारी, ५० पोलिस कर्मचारी, २० होमगार्ड यांच्यासह पोलीस मुख्यालयाच्या स्टायकिंग फोर्सचा बंदोबस्त नेमण्यात आला होता. मोहोळ शहरासह सावळेश्वर टोलनाका, शेटफळ चौक, गिड्डेवाडी, आष्टी, पेनुर, टाकळी सिकंदर, अंकोली, नरखेड, लांबोटी या गावात देखील चोख पोलिस बंदोबस्त नेमण्यात आला होता. 

एकंदरीत मराठा समाजाचे आंदोलन शांततेत पार पडले. मराठा समाजाच्या या आंदोलनाला अन्य समाजातील विविध सामाजिक संघटनांनी देखील पाठिंबा दिला.

सोलापुरात मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आसूड आंदोलन 

पवार साहेबांचा जर कोणी गेम केला असेल तर तो...

मराठा समाजाच्‍या नेत्‍यांनाच मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही : चंद्रकांत पाटील

 "